प्रयागराज – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात एक अचंबित करणारी बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ उघड झाला आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यादरम्यानचा तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह जमिनीवर पडल्याचे दिसत असून, खोलीतील पंखा सुरू असल्याचे दिसत आहे. पोलिस महासंचालक के. पी. सिंह या प्रकरणाबाबत मठात राहणार्या शिष्यांची चौकशी करत असल्याचेही दिसत आहे.
महंतांचा मृतदेह ज्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता, त्याच खोलीतील पावणेदोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरू होताच मंहत नरेंद्र गिरी यांचा जमिनीवर पडलेला मृतदेह दिसत आहे. शेजारी महंत यांच्या कथित सुसाइड नोटमध्ये त्यांचे उत्तराधिकारी सांगितले गेलेले बलबीर गिरी उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओच्या पुढील फ्रेममध्ये एक छायाचित्रकार आणि एक पोलिस अधिकारी दिसत आहेत. त्यानंतर खोलीतील गादी आणि तिथे सजविलेल्या फोटो आणि प्रमाणपत्रांकडे कॅमेरा वळताना दिसत आहे.
पुढील फ्रेममध्ये कॅमेरा खोलीतील पंख्याकडे फिरवण्यात आला. त्यामध्ये पंखा फिरताना दिसत आहे. पंख्याचा रॉड ज्या आकड्यात बसविलेला असतो, त्याच आकड्यामध्ये पिवळ्या रंगाची नॉयलॉनच्या दोरीचा काही भाग दिसत आहेत. महंतांचा मृतदेह ज्या पिवळ्या दोरीवर लटकलेला दिसला ही तीच दोरी आहे. व्हिडिओमध्ये जमिनीवर महंतांच्या मृतदेहाच्या गळ्यातही पिवळ्या दोरीचा तुकडा फसलेला दिसत आहे.
खोलीतील पंखा सुरूच होता की कोणी नंतर सुरू केला याबाबत पोलिस महासंचालक के. पी. सिंह खोलीत उभे असलेल्या महंतांच्या शिष्यांची चौकशी करताना दिसत आहेत. त्यावर सुमीत नावाचा शिष्य सांगतो, की पंखा त्याने सुरू केला आहे. पण त्याला या प्रकरणाबाबत विचारताच तो थेट उत्तर न देता इतर गोष्टी सांगणे सुरू करतो.
दोरीचे तीन भाग कसे झाले?
व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, की महंतांनी ज्या दोरीने गळफास घेतला तिचे तीन तुकडे कसे झाले? दोरी कापून मृतदेह खाली उतरविला असे जरी मानले तरी प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच राहते. कारण दोरीचे दोनच तुकडे होतील. पण खोलीत दोरीचे तीन तुकडे सापडले आहे. दोरीचा सर्वात मोठा तुकडा पंख्याच्या आकड्यामध्ये फसलेला होता. दुसरा भाग महंतांच्या गळ्यात दिसला आणि तिसरा तुकडा खोलीतील काचेच्या कपाटावर दिसला. मृतदेह फासातून उतरविल्यानंतर महंतांच्या गळ्यातील दोरी काढताना तिची गाठ सोडून वेगळे केले जाऊ शकत होते.