लखनौ (उत्तर प्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा अखेर झाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीसह इतर दोघांनी कट रचल्याचे तसेच महंतांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत दि.२५ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी आनंद गिरी, आराध्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी प्रयागराज यांच्या न्यायालयात तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या दुर्देवी घटनेत दि. २० सप्टेंबर रोजी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह श्री मठ बाघंबरी गद्दीतील एका खोलीत छताला लटकलेला आढळून आला होता. गिरी यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांचा शिष्य आनंद गिरी, आराध्या तिवारी आणि मुलगा संदीप यांच्यावर ब्लॅकमेल आणि छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांनाही अटक केली. मात्र, महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा आनंद गिरी यांनी केला आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले.
महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या त्यांचे शिष्य आनंद गिरी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते, कारण त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांचा कथित शिष्य आनंद गिरी याला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आल्यानंतर पोलिसांनी आनंद गिरी यांना अटक केली. यानंतर आनंद गिरी यांच्याबद्दल सगळीकडे चर्चा रंगली होती. त्यांचे काही फोटो ‘हिरो स्टाईल ‘ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमधून आनंद गिरी अत्यंत सुखासिन जीवन जगत होते, असे दिसून येते आहे.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला होता, त्यानंतर मात्र राज्य सरकारच्या विनंतीवरून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. या तपासात ऑक्टोबरमध्ये सीबीआयने तीन आरोपींच्या पॉलिग्राफिक चाचणीची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतर न्यायालयाने सीबीआयचा हा अर्ज फेटाळून लावला. कारण तीन संशयितांनी पॉलीग्राफिक चाचणी करण्यास नकार दिला होता. फॉरेन्सिक आणि इतर तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित आहे.