भास्कर कदम
नांदगाव – निसर्ग कवी ना. धों. महानोर यांच्या धर्मपत्नी व नांदगावच्या माहेरवासीन सुलोचनाताई यांचे आज दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदगावची नाळ खंडित झाली. त्यांच्या इहलोक सोडून जाणे हे नांदगावकरांसाठी मोठे दुःख आहे. सुलोचनाताईंचे वडील त्र्यंबक गणपत मदने (बाबा) हे नांदगाव येथे रेल्वेत नोकरीस होते. त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य नांदगावला होते. येथील आनंद नगरमध्ये सुलोचनाताईंचा जन्म नांदगावचाच होता. लहानपण नांदगावलाच गेले. प्राथमिक शिक्षण नांदगावला झाले. ना.धों. महानोरशी त्यांचे लग्न नांदगावला झाले. दोन्हीकडची परिस्थिती तशी जेमतेम होती. नाधों दादांना वाचनाचे विलक्षण वेड होते. त्यांची वाचनाची भूक नांदगाव येथील शंभर वर्षांची परंपरा असलेले त्याकाळी समृद्ध असलेले रेल्वे लायब्ररी (वाचनालय) येथे भागत असे. आज हा फक्त इतिहास उरला आहे. ना.धों. महानोरचे कायम नांदगावला येणे जाणे होते. सुलोचनाताई यांनी अखेरपर्यंत नांदगावशी नाळ कायम होती.
नांदगावकर पळसखेडे येथे गेले की सुलोचनाताी माहेरची माणसे म्हणून सर्वांचे आदरातिथ्य करीत असे. सुलोचनाताई प्रत्येकाचेच सुहास्यवदनाने स्वागत करीत असे. खरेतर ना.धों. महानोरच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. माणसे व ग्रंथ यावर दोघांनीही सारखेच प्रेम केले. आज ना.धों महानोर खऱ्याअर्थाने पोरके झाले आहेत. त्यांना त्यांच्या आधाराची गरज असतांना त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला आहे.