नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी, तसेच मोकाट गुरांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांवरील प्राण्यांशी संबंधित अपघात टाळण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने(एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांलगत भटक्या प्राण्यांसाठी पशु निवारा उपलब्ध करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.या उपक्रमाचा उद्देश,राष्ट्रीय महामार्गालगत आढळणारी भटकी गुरे आणि जनावरांची काळजी तसेच व्यवस्थापन सुनिश्चित करत प्रवाशांचा प्रवासमार्ग संरक्षित करणे हा आहे.
या पथदर्शी प्रकल्पांतर्गत 0.21 ते 2.29 हेक्टरपर्यंत निवारा क्षेत्र उपलब्ध करून,भटक्या गुरांसाठी सुरक्षित जागा म्हणून मोक्याच्या ठिकाणी निवारे बांधून यांची सुरुवात होईल, जेणेकरून ते राष्ट्रीय महामार्गांवर भटकणार नाहीत.हा उपक्रम विविध राष्ट्रीय महामार्गावर राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी,एनएचएआयने विद्यमान भागधारक मेसर्स गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्यासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये,मेसर्स गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एनएचएआयने प्रदान केलेल्या जमिनीवर गुरांचे निवारे बांधतील.ही कंपनी प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेत, जायबंदी झाल्याच्या संपूर्ण कालावधीत सवलतीच्या दरात प्रथमोपचार, पुरेसा चारा, पाणी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करत त्यांच्या आरोग्याची देखभाल करतील.
या उपक्रमाला अधिक पाठिंबा देण्यासाठी,भागधारक त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत भागधारक जखमी भटक्या प्राण्यांची वाहतूक आणि उपचार करण्यासाठी पशु रूग्णवाहिका तैनात करतील, या प्राण्यांची व्यवस्थित वैद्यकीय काळजी घेण्यासाठी महामार्गांच्या दोन्ही बाजूला 50 किमी अंतरावर प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णालये उभारतील, जेणेकरून या प्राण्यांना वेळीच योग्य उपचार मिळतील.
या उपक्रमाविषयी बोलताना,एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव म्हणाले, “राष्ट्रीय महामार्गांवरील भटक्या गुरे/प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देत, हा अनोखा उपक्रम म्हणजे एनएचएआयने आपली बांधिलकी वाढवत प्रवाशांसाठी सुरक्षित राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यासाठी उचललेले आणखी एक पाऊल आहे.रस्त्यांची सुरक्षा घेत भटक्या गुरांची/प्राण्यांची काळजी घेण्याचे भूतदया दाखविण्याचे कार्य यामुळे पूर्ण होते.
राष्ट्रीय महामार्गालगत भटक्या गुरे/प्राण्यांसाठी आश्रयस्थान विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो आणि या उपक्रमासाठी आमचा पाठिंबा देऊ करतो. असे यावेळी आपले विचार मांडताना राष्ट्रीय महामार्ग बिल्डर्स फेडरेशन अध्यक्ष दिनेश चंद्र अग्रवाल, म्हणाले.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भटक्या गुरे/प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एनएचएआयला तोंड द्यावे लागत आहे, जे रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे.राष्ट्रीय महामार्गावरील गुरे बाजूला करण्यासाठी यापूर्वी अनेक पावले उचलली गेली असली तरी सामाजिक आणि संवेदनशील कोन असलेल्या भूतदयेशी निगडीत अनेक पूरक समस्यांमुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.