नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू भवन येथील कार्यालयात आज परदेशी वार्ताहरांना महाकुंभमेळ्याच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्वाबद्दल माहिती देण्यात आली. या वार्ताहर परिषदेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आणि उत्तर प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जगभरातील लाखो भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या या पर्वाचे वर्णन धार्मिक, सांस्कृतिक आणि आत्मशोधाचे प्रतीक असे करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकार मधील अधिकाऱ्यांनी महाकुंभमेळा 2025 च्या भव्यतेची व्याप्ती विशद करून तपशीलवार माहिती दिली, तसेच जगभरातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून भर दिला.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकारने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाकुंभमेळ्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वावर भर देण्यात आला. महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्याचे मूळ पुराणकाळातील समुद्र मंथनात (महासागर मंथन) असून अमृत मंथनांनंतर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी जिथे अमृताचे थेंब पडले, तिथे पवित्र स्नान करून अंतरात्म्याचे शुद्धीकरण केले जाते जे आत्म-साक्षात्काराचे प्रतीक आहे.
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, महाकुंभ 2025 मध्ये सुमारे 45 कोटीपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा असून यामध्ये परदेशातील 15 लाख पर्यटकांचा समावेश आहे. त्या तुलनेत 2019 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याला 25 कोटी लोकांनी हजेरी लावली होती. विविध संस्कृती आणि परंपरांच्या व्यक्तींना एकत्र आणणारे एकता आणि समानतेचे व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे.
लोकांच्या उपस्थितीच्या निकषावर महाकुंभ मेळा निश्चितच जागतिक स्तरावर होणाऱ्या इतर कोणत्याही कार्यक्रमाला मागे टाकेल, असे उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी परदेशी वार्ताहरांशी संवाद साधताना सांगितले. रिओ कार्निव्हलमध्ये 70 लाख, हजमध्ये 25 लाख आणि ऑक्टोबरफेस्टमध्ये 72 लाख लोकांनी हजेरी लावली तर त्या तुलनेत 2025 महाकुंभ मेळ्यामध्ये 45 कोटी लोकांची उपस्थिती अतुलनीय आहे. यावरूनच हा मेळावा जगातील सर्वात मोठ्या संमेलनांपैकी एक असल्याचे दिसून येते आणि त्याची भव्य व्याप्ती आणि जागतिक महत्त्व अधोरेखित होते.
महाकुंभ मेळा 2025 मुळे आर्थिक घडामोडींना मोठी चालना मिळणार असून भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे योगदान मिळू शकेल. तर उत्तर प्रदेशच्या जीडीपी मध्ये 1% इतकी वाढ अपेक्षित आहे. दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या व्यापारात 17,310 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असून हॉटेल आणि पर्यटन क्षेत्राची उलाढाल 2,800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. धार्मिक साहित्याच्या विक्रीतून अंदाजे 2,000 कोटी रुपये. आणि फुलांच्या विक्रीतून 800 कोटी रुपये उत्त्पन्न मिळू शकेल.
हा मेळा अतिशय सुरक्षित आणि सुविहितपणे संपन्न व्हावा यासाठी प्रयागराज मध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सेवा सुविधा करण्यात आल्या आहेत. यापैकी प्रमुख प्रकल्पांमध्ये 14 नवीन उड्डाणपूल, 9 कायमस्वरूपी घाट, 7 नवीन बस स्थानके आणि 12 किलोमीटरचे तात्पुरते घाट यांचा समावेश आहे. 37,000 पोलीस, 14,000 होमगार्ड आणि 2,750 कृत्रिम बुद्धिमत्तेवर -आधारित सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करून सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत.
आरोग्य सेवांसाठी 6,000 खाटा, 43 रुग्णालये आणि हवाई रुग्णवाहिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कार्यक्रमादरम्यान स्वच्छता राखण्यासाठी 10,200 स्वच्छता कर्मचारी आणि 1,800 गंगा सेवादूत तैनात आहेत.
महाकुंभ 2025 मध्ये किन्नर आखाडा, दशनम सन्यासीनी आखाडा आणि महिला आखाड्यांसह 13 आखाड्यांचाही सहभाग आहे. या आखाड्यांच्या समावेशाने लिंग समानता आणि एक प्रगतिशील दृष्टिकोन दिसून येतो. हा मेळा जात, धर्म आणि सांस्कृतिक वैविध्याच्या पलीकडे एकतेला प्रोत्साहन देत आहे. या मेळ्याच्या धार्मिक महत्वासोबतच महाकुंभ मेळा जागतिक स्तरावर भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवतो आणि आर्थिक समृद्धीला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचे वार्तांकन करताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच प्रयागराज संगमावर माध्यम प्रतिनिधींना सुविहितपणे प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.