नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर, २०२५ च्या महाकुंभातील दुसरे अमृत स्नान आज करण्यात आले. प्रयागराजमधील शाश्वत आणि शुद्ध त्रिवेणी संगम येथे कोट्यवधी भाविकांनी दुसरे अमृत स्नान केले. महाकुंभ केवळ श्रद्धा,विश्वाकस आणि भक्तीचे प्रतीक नाही तर एकता, समानता आणि सांस्कृतिक विविधतेचे एक असामान्य उदाहरण आहे. भारतीयांबरोबरच, मोठ्या संख्येने परदेशी भाविकांनीही पवित्र त्रिवेणी संगमामध्येत स्नान केले आणि ते भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे साक्षीदार बनले.
त्रिवेणी संगमामध्येश प्रथम स्नान करण्याची ऐतिहासिक परंपरा संत, नागा संन्यासी आणि आखाड्यांनी मोडण्याची ही पहिलीच वेळ होती. एकूण झालेल्या प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन, आखाड्यांनी त्यांचे ब्रह्म मुहूर्तावरील अमृत स्नान काही वेळासाठी पुढे ढकलले आणि भाविकांना पहिल्यांदा स्नान करण्याची परवानगी दिली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी नमूद केले की, सर्व आखाड्यांनी परिस्थितीचा विचार करून प्रथम भाविकांना अमृत स्नान करण्याची परवानगी देण्याचे मान्य केले. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर, आखाड्यांनी त्यांच्या भव्य अमृत स्नान परंपरेचे प्रतीकात्मक पालन केले.
दुसऱ्या अमृतस्नानाच्या दिवशी भारतातील तिन्ही पीठांच्या शंकराचार्यांनी त्रिवेणी संगमावर डुबकी मारली. शंकराचार्यांनी भाविकांना संयम राखण्याचे आवाहन केले. शृंगेरी शारदा पीठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी विधू शेखर भारती, द्वारका शारदा पीठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, यांनी या दिवशी त्रिवेणी संगमावर पवित्र डुबकी मारली. शंकराचार्यांनी धार्मिक विधींसह स्नान केले आणि देशाच्या कल्याणासाठी आशीर्वाद दिले. अमृतस्नान सुरळीतपणे पार पडावे यासाठी कुंभमेळा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण कुंभमेळा परिसरात अभूतपूर्व सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या असून राज्य पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.
भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. याशिवाय घाटांवर गंगा सेवा दूत तैनात करण्यात आले होते. नदीची स्वच्छता राखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत होते. हे गंगा सेवा दूत नदीत वाहलेली फुले आणि इतर पूजा साहित्य ताबडतोब बाहेर काढून गंगा आणि यमुना नदीची स्वच्छता कायम राखत होते. मेळा प्रशासनासह स्थानिक प्रशासन, पोलीस, सफाई कर्मचारी, स्वयंसेवक, नाविक आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय विभागांनी या बंदोबस्तासाठी हातभार लावला.