इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशभरातील कारागिरांसाठी महाकुंभ 2025 ही सुवर्णसंधी ठरू लागली आहे. प्रयागराज इथल्या संगमावर होत असलेल्या या भव्य सोहळ्याच्या ठिकाणी 6000 चौरस मीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP) अर्थात एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेचे आकर्षक प्रदर्शन भरवले गेले आहे. या प्रदर्शनात मांडलेले गालिचे, झरी-जरदोसी, फिरोजाबाद मधली काचेची खेळणी, वाराणसीतील लाकडी खेळणी आणि इतर हस्तकलेची उत्पादने अशा वस्तू भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरू लागल्या आहेत.
2019 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी 4.30 कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल झाली होता आणि यंदा ही व्यवसायिक उलाढाल 35 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा प्रयागराज विभागाचे सह उद्योग आयुक्त शरद टंडन यांनी व्यक्त केली आहे. यामुळे व्यवसाय आणि रोजगार निर्मितीचे नवे मार्ग निर्माण होतील असेही त्यांनी म्हटले आहे.
यंदा महाकुंभात फ्लिपकार्टने देखील एक दालन उभारले आहे आणि त्यांनी उद्योजकांना त्यांची उत्पादने आपल्या व्यासपीठारून विनामूल्य विकण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे. या फ्लिपकार्टच्या दालनावर खरेदीदार आणि भेट देणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
महाकुंभात भरवलेल्या प्रदर्शनात काशी (वाराणसी) इथल्या कारागिरांनी लाकडी खेळणी, बनारसी ब्रोकेड, ओतकाम आणि कोरीवकाम केलेल्या धातूच्या वस्तूंसह अनेक उत्पादने मांडली आहे. या प्रदर्शनात एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील 75 भौगोलिक सांकेतांकधारीत उत्पादनेही प्रदर्शित केली असून, त्यापैकी 34 उत्पादने काशी क्षेत्रातीलच आहेत, अशी माहिती भौगोलिक संकेततज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांनी दिली. यात वाराणसी इथली लाल मिरची, बनारसी साड्या, सुरेखा पेरू, प्रतापगड इथला आवळा, मिर्झापूर मधील पितळेची भांडी आणि गोरखपूर इथल्या टेराकोटा वस्तूंचा समावेश आहे. कुशीनगर मधले गालिचे, फिरोजाबाद इथली काचेची खेळणी आणि भांडी या वस्तूदेखील या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. बनारसी थंडाई, लाल पेडा, बनारसी तबला, वॉल पेंटिंग्ज अशा अनोख्या रचनांकडे जगाचे लक्ष वेधले जावे यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.
एक जिल्हा एक उत्पादन हा उपक्रम हस्तकला आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीचा एक अभिनव प्रयत्न आहे. महाकुंभ 2025 हा सोहळा केवळ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता अधिक बळकट करणारेच नाही, तर त्या ही पलिकडे हा मेळा उद्योजकांसाठी देखील एक विशाल व्यासपीठ ठरू लागले आहे. या मेळ्याला आलेले जगभरातील लोक कारागिरांच्या उत्पादनांचा प्रदर्शनाला भेट देत आहेत, त्यांचे कौतुक करत आहेत आणि खरेदी देखील करत आहेत.