उज्जैन (मध्य प्रदेश) – धार्मिक स्थळे किंवा मंदिरांमध्ये सर्वांना प्रवेश असतो. परंतु याबाबत न्यास, विशस्त मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने काही नियम केलेले असतात. याचे कारण म्हणजे कुठलाही गैरप्रकार घडू नये किंवा गोंधळ होऊ नये. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात काही गैरप्रकार घडू नये, म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र असे असतानाही काही समाज कंटक तथा घुसखोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे बनावट ओळखपत्र दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली. महाकालेश्वर मंदिरात पहाटे ही घटना घडली. बंगळुरू येथील रहिवासी मोहम्मद युनूस नावाच्या व्यक्तीने ‘भस्म आरती’ दरम्यान मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शहर पोलीस अधीक्षक पल्लवी शुक्ला यांनी सांगितले की, मंदिरात दररोज पहाटे चार वाजता भस्म आरती केली जाते. तेव्हा या व्यक्तीने अभिषेक दुबे नावाच्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरून भस्म आरतीसाठी प्रवेश पास घेतला होता. मात्र, त्याच्याकडे आधार कार्डचा फोटो सापडला नाही. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीचे बायोमेट्रिकही तपासले, मात्र ते कार्डच्या बायोमेट्रिकशी जुळले नाही.
सुरक्षा कर्मचार्यांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दुसरे ओळखपत्र सापडले. त्यामध्ये त्याचे खरे नाव मोहम्मद युनूस आहे. त्याची मैत्रिण खुशबू यादवसोबत तो मंदिरात आला होता. खुशबूने त्याच्यासाठी हे आधार कार्ड तयार केले होते. मंदिर व्यवस्थापन समितीच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीबाबत अन्य बाबींचाही तपास व चौकशी सुरू आहे.