नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर ‘भारतीय ज्ञान प्रणाली – सामान्य’ (Indian Knowledge System – Generic) हा पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० नुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत, म्हणजेच मराठीत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘महाज्ञानदीप’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (मुंबई) यांनी दिनांक १२ मार्च २०२४ रोजी केलेल्या सामंजस्य करारातून या प्रकल्पाची पायाभरणी झाली. त्यानंतर दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन झाले होते. या उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आय.आय.टी. मद्रास आणि आय.आय.टी गांधीनगर यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील प्राध्यापकांना ई-कंटेंट निर्मितीचे प्रशिक्षण देत आहे. त्यातील ६० पेक्षा अधिक प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या मदतीने भारतीय ज्ञान प्रणाली – सामान्य (आयकेएस सामान्य – Indian Knowledge System – Generic) हा पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची मूलतत्त्वे, विविध अंग व त्यांचे आधुनिक काळातील महत्त्व समजावून सांगतो. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह २ क्रेडिट्स मिळणार असून जे त्यांच्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतील.
अभ्यासक्रम वैशिष्ट्ये:-
- पात्रता: १२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा)
- भाषा: मराठी
- कालावधी: ६ महिने (१ सत्र)
- शिक्षण पद्धत: पूर्णपणे ऑनलाइन
- मूल्यमापन: ऑनलाइन मूल्यमापन आणि अंतिम ऑनलाइन परीक्षा (बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न – MCQ)
- प्रवेश शुल्क: केवळ ₹१२०/-
या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadnyandeep.org या पोर्टलला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा किंवा ७८२१९२३५५२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण
“महाज्ञानदीप उपक्रम हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. ‘भारतीय ज्ञान प्रणाली – सामान्य’ हा पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेची मुळे समजावून सांगत असतानाच त्यांचा आधुनिक दृष्टिकोनही अधिक बळकट करेल. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे क्षितिज खुले होणार आहे.”
प्रा. संजीव सोनवणे, मा. कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.