विशेष प्रतिनिधी, मुंबई :
गेल्या दिड वर्षात कोरोना काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच सध्या देखील अनेक सुशिक्षित तरुण -तरुणी बेरोजगार आहेत. प्रत्येक जण नोकरीची संधी शोधत आहेत. त्यातच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार असून यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या विविध पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता (आर्हता ) अनुभव, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील या संदर्भातील जाहीरातीमध्ये देण्यात आले आहे. याकरिता उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे असून म्हाडामध्ये विविध पदांच्या एकूण ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
सदर भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक – प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक आदि जागा भरल्या जाणार आहेत. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य) १२ जागा, मिळकत व्यवस्थापक – प्रशासकीय अधिकारी २ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिक ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक २०७ जागा, लघुटंकलेखक २० जागा, भूमापक ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा अशा प्रकारे या रिक्त जागा आहेत.
सदर रिक्त पदांसाठी आज, शुकवार, दि. १७ सप्टेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत असून उमेदवारांना दि. १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परंतु या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहीरात व्यवस्थित वाचावी. तसेच पदभरतीचे पात्रता निकष समजून घेऊन त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये कोणतीही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. पदभरतीमध्ये आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. या संदर्भात सविस्तर तपशील म्हाडाची अधिकृत https://mhada.gov या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती सचिव, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ( म्हाडा ) यांनी दिली आहे.