इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे, असं आपण म्हणतो. तंत्रज्ञानामुळे गोष्टी सोप्या होत गेल्या. मात्र यासोबत गुन्हेगारही प्रगत होत गेले आहेत याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आसपास पाहतो. सामान्य माणसासोबतच अनेकदा सेलिब्रिटी देखील यांचे लक्ष्य होताना दिसतात. नुकताच एका अभिनेत्याला या सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. त्यामुळे या अभिनेत्याचं सुमारे पावणे चौदा लाखांचं नुकसान झालं आहे.
‘महाभारत’ फेम अभिनेते पुनीत इस्सर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. पुनीत इस्सर यांचा ई-मेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने अभिनेत्याचे ई – मेल अकाउंट हॅक करून १३.७६ लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये पुनीत इस्सर यांचा शो आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान हा प्रकार घडला. आरोपीने अभिनेत्याचा ई- मेल हॅक केला. यानंतर शोच्या बुकिंगचे पावणे चौदा लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. पुनीत त्यांचा ई- मेल ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पुनीत इस्सर यांनी त्यांच्या ‘जय श्री राम’ या हिंदी नाटकासाठी एनसीपीए थिएटर बुक केले होते. यासाठी त्यांना १३,७६,४०० रुपये देण्यात आले. १४ आणि १५ जानेवारी २०२३ रोजी पुनीत या नाटकाचा प्रयोग करणार होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या थिएटर प्रोडक्शन कंपनीच्या मेल आयडीवरून बुकिंग केले होते. २२ नोव्हेंबर रोजी पुनीत इस्सर यांनी एनसीपीएला मेल करण्यासाठी त्यांचा मेल आयडी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेल आयडी उघडला नाही. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुनीत इस्सर हे महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते बिग बॉसमध्येही दिसले होते.
Mahabharat Fame Actor Puneet Issar Cyber Crime Cheating
Entertainment