नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ९० च्या दशकात प्रत्येक भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलेल्या महाभारत या मालिकेतील भीम तुम्हाला आठवतोय का? बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हे गारुड इतके होते की, कलाकार खऱ्या नावाने नव्हे, तर व्यक्तीरेखेच्या नावाने ओळखले जात होते. महाभारतात भीमाची व्यक्तिरेखा साकारणारे प्रवीण कुमार हे त्यापैकी एक. याच प्रवीण कुमार यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. येथील अशोक विहार येथे त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
प्रवीण कुमार यांनी दूरचित्रवाणी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केले. प्रवीण कुमार हे खेळाडूही होते. त्यांनी आशियायी क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदक पटकावले होते. नंतर आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. इतके यश मिळवूनही प्रवीण कुमार यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती.
सरकारकडे मागणी
आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने जगणे सुसह्य होण्यासाठी प्रवीण कुमार यांनी खेळातील योगदान पाहता सरकारकडे निवृत्तिवेतनाची मागणी केली होती. त्यांना बीएसएफकडून निवृत्तीवेतन मिळत होते. परंतु त्यांच्या दररोजच्या जगण्यासाठी हा निधी खूपच अपुरा पडत होता. पंजाबमधील जितके सरकार आले त्या सर्वांबद्दल त्यांची तक्रार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूला निवृत्तीवेतन देण्यात आले, परंतु त्यांना मिळाले नाही. त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सहभाग घेतला होता, तरीही निवृत्तीवेतन मिळाले नाही, अशी त्यांची तक्रार होती.
सगळेच विसरले
एनबीटी या संकेतस्थळाशी बोलताना प्रवीण कुमार म्हणाले होते की, मी आता ७६ वर्षांचा असून, घरीच असतो. आजकाल तब्येत चांगली नसते. पत्नी वीणा देखभाल करते. एक असा काळ होता की भिमाला सर्व ओळखत होते. आता सगळेच विसरले आहे. प्रवीण कुमार यांना एक मुलगी असून, ती लग्नानंतर सध्या मुंबईत राहते.
क्रीडा स्पर्धेत सहभाग
प्रवीण कुमार हे हातोडा आणि थाळीफेक या खेळात पारंगत होते. त्यांनी १९६६ मध्ये किंगस्टनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेऊन रौप्यपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी १९६६ आणि १९७० मध्ये झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी १९६८ आणि १९७२ मध्ये उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. १९७४ मध्ये तेहरान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रवीण कुमार म्हणाले होते की, सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण नंतर त्यांचे पाठीचे दुखणे सुरू झाले.
अशी मिळाली भिमाची भूमिका
प्रवीण कुमार यांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये उपकमांडंटची नोकरी मिळाली होती. १९८६ मध्ये त्यांना बी. आर. चोप्रा महाभारत बनवत असून त्यासाठी भीमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची गरज असल्याचा संदेश मिळाला होता. ते बी. आर. चोप्रा यांना भेटण्यासाठी गेले. जसे त्यांनी प्रवीण कुमार यांना पाहिले, ते त्वरित म्हणाले, भिम मिळाला. त्यांची व्यक्तिरेखा इतकी गाजली की प्रवीण कुमार यांचा चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी मार्ग खुला झाला. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटात काम केले. तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.
राजकारणात प्रवेश
प्रवीण कुमार यांनी राजकारणातही नशीब आजमावले आहे. २०१३ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.