मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहे. या पत्रकार परिषदेते कोणात पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडी होणार अशी चर्चा असतांना देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेची माहिती दिली. काँग्रेस व शिवसेनेत असलेल्या काही जागांवरुन असलेला तिढा सुटला की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरु आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचे यावेळी अनिल देसाई यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. १५ तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. सकाळी उध्दव ठाकरे सोबत बैठक झाली. आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.