पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य बोर्डाची इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेबाबत मोठा खुलासा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत मोठा संभ्रम होता. मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन झाल्यामुळे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी अखेर स्पष्टता केली आहे, इयत्ता १०वी आणि १२वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे.
गोसावी म्हणाले की, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल. गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थी त्यांच्या शाळेतच पेपर देऊ शकतील. यासंदर्भात आम्ही मुख्याध्यापक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली आहे. अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा एखादा पेपर देता येत नसेल तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. तसेच, लेखी परीक्षेत ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे तर ७०, ८० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक दिला जाणार आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.