विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत मध्यस्थाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गाठीभेटी सध्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी राऊत यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये अनेक वेळा समन्वयाचा अभाव आढळून येतो. या सरकारमध्ये सहभागी तिन्ही घटक पक्षांच्या मंत्र्यांकडून वारंवार परस्परविरोधी विधाने केली जातात. सहाजिकच विरोधी पक्षाच्या हाती टीकेचे कोलीत मिळते. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा खुलासा वारंवार करावा लागतो. त्यामुळे या तीन पक्षांमधील कोणतेही महत्त्वाचे नेते एकमेकांना भेटले की, लगेच राजकीय चर्चेला उधाण येते. सध्या ही अशीच परिस्थिती आहे.
संजय राऊत यांनी एकाच दिवसात प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर लगेचच काही अवधी नंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटी दरम्यान नेमके काय घडले ? याबद्दल काल दिवसभर चर्चा सुरू होती. स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेले खासदार संजय राऊत यांनी सोमवारी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘वर्षा’वर एक तास चर्चा केल्यानंतर ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वीस मिनिटे चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात होणार असून त्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, असा काँग्रेस पक्षाचा आग्रह असताना घडामोडींना अचानक वेग आला आहे. त्यातच आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, माजी मंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स, अनिल परब यांच्यासह आणखी दोन मंत्री ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडू शकतात असे राजकीय गोठात म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे संजय राऊत हे एका आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलिकडे स्वबळाचा नारा दिल्यानंतर तसे होणार असेल तर शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले होते. तसेच राज्यातील सध्याचे आघाडी सरकार उत्तम चालले असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी बारामती येथे व्यक्त केले होते.
उद्धव ठाकरे यांचा कोणता निरोप संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे पोहोचवला, याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरु आहेत. पवार आणि ठाकरे यांच्यात काही विसंवाद आहे का आणि तो दूर करण्यासाठी राऊत यांनी शिष्टाई केली का, अशी शंकाही उपस्थित होत आहे. पवार अलिकडे दोनदा ठाकरे यांना जाऊन भेटले होते. यावेळी ते स्वत: गेले नाहीत.