इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सुरू असलेल्या इयत्ता बारावीचा राज्य बोर्डाचा केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खासगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकाने हा पेपर फोडल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे मालाड येथील या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. याच शिक्षकाने बारावी रसायनशास्त्राचा पेपर विद्यार्थ्यांना दिल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच इयत्ता बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. या परीक्षेबाबत नानाविध प्रकारच्या संभ्रमावस्था निर्माण झाली. अखेर ही परीक्षा होत असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला आहे. परीक्षा होण्यापूर्वीच हा पेपर विद्यार्थ्यांना मोबाईलवर देण्यात आला. विलेपार्ले पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव मुकेश यादव असे आहे. या शिक्षकाने त्याच्या क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना व्हॉटसअॅपवर रसायनशास्त्राचा पेपर दिल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे पेपर मिळाले होते त्यांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. हा पेपर किती जणांना मिळाला यासह अन्य बाबींची खातरजमा पोलिसांकडून सुरू आहे. फक्त हाच पेपर फुटला की अन्य विषयाचेही पेपर फुटले, या शिक्षकाला हे पेपर कुठून आणि कसे मिळाले यासह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सर्व काही पोलिस तपासावरच अवलंबून आहे.