मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याबाहेर मराठीबहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून २७ ते २९ ऑगस्ट, २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. उर्वरित कार्यक्रम ०१ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे तर ३ सप्टेंबर २०२५ रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा या राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.