मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज माघी गणेश जयंती म्हणजेच तिलकुंद चतुर्थी साजरी होत आहे. चौसष्ट कलांची आद्य देवता असणाऱ्या श्री गणपतीचा जन्म माघी गणेश जयंती अर्थात माघ शुद्ध चतुर्थीला झाला, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी श्री गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनात गणेश भक्तांतर्फे जगभर साजरा केला जातो. या दिवशी गणेश मंदिरांमध्ये फुलांची सजावट करून दिव्यांची आरास केली जाते. त्याचप्रमाणे परिसर रांगोळ्यांनी सुशोभित केला जातो.
यंदाच्या गणेश जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवयोग व रवी योग याच दिवशी येत आहेत. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. या दिवशीच्या नैवेद्य तसेच आहारात तिळापासून बनवलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. गणपतीच्या नैवेद्य मध्ये तिळ-गुळ असतो तर आहारामध्ये तीळ व गुळाची पोळी हमखास असते. या दिवसातील थंड हवामानामुळे अशाप्रकारच्या खाद्यपदार्थांची पूर्वापार रचना केलेली आढळते.
सिद्धीविनायकाचे थेट दर्शन घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
यंदाची चतुर्थी ही शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी 04:38 पासून शनिवार पहाटे 03:47 पर्यंत आहे. गणेश जयंतीला श्री गणेश पूजन त्याचप्रमाणे संपूर्ण शिव कुटुंब पूजन आराधना यास विशेष महत्त्व आहे. जगभरात अनेक ठिकाणी माघी गणेश जयंतीला गणेशमूर्तींची पालखीमध्ये पंचक्रोशी परिक्रमा मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते.
पालखी मार्ग सडा-रांगोळी यांनी सुशोभित केला जातो .या दिवशी गणपती पूजन करताना नियमित षोडशोपचार पूजा सोबतच गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश याग, सहस्त्रावर्तन पठण ,हे गणेश भक्तां तर्फे केले जाते. या दिवशीच्या पूजेमध्ये लाल जास्वंद फुल व एकवीस दुर्वांची जुडी श्री गणपती यास वाहण्यास विशेष महत्त्व आहे. श्रीगणेशाच्या जन्मदिवसामुळे महाआरती सोबतच गणेश जन्माचा पाळणा ही गायला जातो. महानैवेद्द्यामध्ये अन्य पक्वान्नांसोबत मोदक हे गणपतीचे प्रिय खाद्य अवश्य बनवले जाते. अन्य दिवसाच्या चतुर्थी प्रमाणे माघी गणेश जयंती चा उपवास हा त्याच दिवशी चंद्रोदयला न सोडता तो दुसऱ्या दिवशी सोडावा.
गणपती बाप्पा मोरया