इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आरा हे बिहारमधील एक लहान पण ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर आहे. तिथे असलेल्या रामना मैदानाला लागून अनेक चहाचे स्टॉल आहेत, पण त्यातल्या त्यात आयआयटीयन चाय वाला या नावाने चालणारा चहाचा स्टॉल लोकांचं लक्ष वेधत आहे. आयआयटी आणि विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी हा स्टार्टअप प्रोजेक्ट सुरू केला आहे. आयआयटी मद्रासमधील डेटा सायन्समध्ये बीएससीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आणि टी-स्टॉल उघडणारा रणधीर कुमार यांनी या चहा स्टॉलविषयी माहिती दिली. ते म्हणतात, देशातील विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या चार मित्रांनी रोजगार निर्मितीसाठी हा स्टार्टअप सुरू केला आहे. यामध्ये खरगपूर आयआयटीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी जगदीशपूरचा अंकित कुमार, बीएचयूमध्ये शिकणारा इमाद शमीम आणि एनआयटी सुरतकलमध्ये शिकणारा सुजन कुमार यांचा समावेश आहे.
एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना चौघांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीतूनच हा स्टार्ट अप सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा उद्देश होता. चहाच्या टपरीवर त्यांनी सध्या दोन, तीन जणांना रोजगार दिला आहे. सध्या आरा येथे स्टॉल असून वर्षाच्या अखेरीस देशात तीनशे स्टॉल्स उघडण्याची योजना आहे. स्टार्टअपला पुढे नेण्यासाठी ते आर्थिक सहकार्यासाठी विविध संस्थांशी बोलणी करत आहेत. भविष्यात आपल्या या स्टार्टअपला पर्यावरण संरक्षणाशी जोडण्याचा मानस या टीमने व्यक्त केला आहे. सध्या ते स्टॉलवर कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरत नाहीत आणि फक्त कुल्लडमध्येच चहा देतात. यापुढील काळात वापरलेले कुल्लड उच्च दाबाच्या पाण्याने धुवून त्यामध्ये रोपटे लावून तेही ग्राहकांना स्टॉलच्या माध्यमातून अत्यल्प दरात देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आयआयटीयन चहाच्या दुकानात चहा एक-दोन नव्हे तर दहा फ्लेवर्स मिळतात. यामध्ये लिंबू, आंबा, संत्रा, पुदिना, ब्लूबेरी इत्यादी चवींचा चहा लोकांना आवडतो. चहा बनवणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, चहा देण्यापूर्वी ते कुल्लड चुलीच्या आगीत गरम करतात, त्यामुळे त्याला एक अनोखी चव येते.