इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्यप्रदेशात काँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या एका दिग्गज नेत्याची आता काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेससाठी अच्छे दिन आले आहेत, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.
२०१८ मध्ये मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आले. त्यानंतर २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सारे चित्र बदलले. सिंधिया यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले. यात एक मोठे नाव होते ते बैजनाथ सिंह यांचे. बैजनाथ हे सिंधिया यांचे विश्वासू सहकारी आणि शिवपुरीचे अनुभवी नेते आहेत. सिंधिया यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, पण मध्यप्रदेशातील सरकार बैजनाथ यांच्यामुळे कोसळले असे म्हटले जाते.
कमलनाथ यांची सत्ता जाऊन शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आले. आता बैजनाथ यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये परत येत असल्याचे म्हटले आहे. ७३ वर्षीय बैजनाथ सिंह यांनी काँग्रेसमध्ये यावे, असा भोपाळमधील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बैजनाथ यांच्यासोबत भाजपाचे १५ जिल्हापातळीवरचे नेतेही काँग्रेसमध्ये दाखल झाले.
कमलनाथ यांनी बैजनाथ यांचे स्वागत केले. त्याचवेळी टोमणाही मारला. ‘आज मला खूप आनंद झाला आहे. कारण बैजनाथ हे काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी आलेले नसून ते सत्यासाठी इथे आले आहेत. मी काही महाराजा नाही, माझ्याकडे राजवाडा नाही. तुम्ही आजवर फक्त महाराजाला पाहिले, यापुढे आता कमलनाथलाही पाहून घ्या,’ असे कमलनाथ म्हणाले.
यांनी केले प्रयत्न
काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचे सुपूत्र आणि काँग्रेस आमदार जयवर्धन सिंह यांनी बैजनाथ यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. बैजनाथ यांना सत्याची जाण झाली आहे, अशी प्रतिक्रिया जयवर्धन सिंह यांनी दिली आहे.
७०० वाहनांचा ताफा
बैजनाथ यांची काँग्रेसमधील घरवापसी एक मोठा इव्हेंट ठरला. ७०० वाहनांचा ताफा आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास असा दमदार प्रवेश होता. सर्व कार्यकर्त्यांसोबत बैजनाथ काँग्रेसमध्ये सामील झाले. हे एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे.