इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील धार परिसरात भरुडपाडा आणि कोठीदाच्या मध्ये असलेल्या कारम नदीवरील धरणातून गळती वाढत चालल्याचे दिसून येत आहे. धरणाच्या एका बाजूची माती वाहून गेली असून त्यामुळे धरणाच्या भिंतीचा मोठा भाग कोसळला आहे. धरण पुटण्याच्या भीतीने सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळेच १८ गावे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. या गावांमधील ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कारम नदीवरील धरण हा अनेकदा वेगवेगळ्या बाबतीत चर्चेचा विषय राहिला आहे. आता हे धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने या परिसरातील १८ गावे रिकामी केली आहेत. यात धार जिल्ह्यातील १२ आणि खरगोन जिल्ह्यातील ६ गावांचा समावेश असून, सुमारे ४० हजार ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याबरोबरच, धरण फुटले तर ते पाणी ज्या नदीतून जाईल त्यावर आगरा मुंबई राष्ट्रीय महामार्गाचा पूल आहे. या पुलावरील वाहने वाहून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
या पुलावरुन वाहतूक कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी जमा झाली आहे. एयरफोर्सचे दोन हेलिकॉप्टर मदतीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत, अशी माहिती राज्याच्या अप्पर गृह सचिवांची दिली आहे. धार जिल्ह्यात ३०४.४४ कोटींच्या निधीतून कारम नदीवर धरण बांधण्यात येत आहे. हे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ५२ गावांतील १० हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, या धरणाच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हणणे राजकीय नेत्यांकडून मांडले जात आहे. त्यामुळे हा मुद्दा आता राजकारणाचा होत आहे.
उपाययोजनांवर भर..
धरणातील पाणी कसे कमी करता येईल यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी धरणाच्या बाजूने एक कॅनॉल बाहेर काढण्याचे कामदेखील सुरु करण्यात आले आहे. धरणातील पाणी कमी झाले तर आपोआपच पुराचा धोका कमी होईल. हे धरण अद्याप बांधकामाच्या अवस्थेत आहे, त्यापूर्वीच पावसामुळे इथे पाणी जमा झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लगेचच हे धरण फुटेल अशी स्थिती नसल्याचाही दावा करण्यात येत आहे. मात्र खबरदारी म्हणून तत्परतेने लोकांचे स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. शिवाय, चार पोकलेन मशिनींच्या सहाय्याने कॅनॉल खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दुसरीकडे ढासळलेल्या भागाच्या डागडुजीचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या पाऊस थांबला आहे परंतु, पावसाने पुन्हा जोर धरल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील १० तास महत्त्वाचे मानण्यात येत आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणा सध्या या परिसरात तळ ठोकून आहेत.
Madhya Pradesh Dam Burst Threat 18 Village empty