इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाज कितीही प्रगत झाला असला तरी अंधश्रद्धेपोटी आजही अघोरी प्रकार सुरूच आहेत. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून अशीच वेदनादायी घटना समोर आली आहे. अवघ्या ३ महिन्यांच्या चिमुकलीला ५१ वेळा लोखंडी सळी गरम करून चटके दिले गेले. न्यूमोनियावर उपचाराच्या नावाखाली हा अघोरी प्रकार करण्यात आला. असाह्य वेदनांनी तडफडणाऱ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरांपासून लांबवर असणाऱ्या प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये आजही बुवाबाजीसारखे प्रकार सुरूच आहे. शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर कथौटिया येथील ३ महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. घरच्यांनी तिला भोंदूबाबाकडे नेले. तिथे लोखंडी सळीचे चटके दिल्याने ती अत्यवस्थ झाली. हा छळ ती सहन करू शकली नाही आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
असे झाले उघड
प्रकृती खालावत असताना घरच्यांनी मुलीला जवळच्या भोंदूबाबाकडे नेले त्याने उपचार सोडाच गरम सळीने चटके दिले. प्रकृती अधिकच खालावल्याने मात्र कुटुंबीय घाबरले. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आल्याने भोंदूबाबाचे बिंग फुटले. डॉक्टरांकडूनच पोलिसांना घटनेची माहिती दिली गेली. डॉक्टरांनी तपासणी केली असता न्यूमोनियाचा संसर्ग मेंदूमध्येही पसरला असल्याचे लक्षात आले. अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
तपास सुरू
शहडोलच्या जिल्हाधिकार्यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकेने नवजात मुलीच्या आईची दोनदा समजूत काढली होती. यानंतरही मुलीला गरम लोखंडी रॉडने चटके देण्यात आले. बैद्यकशास्त्रानुसार हा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे निदान करण्यात आले आहे. परंतु, चटके दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात पोहोचले असता त्यांना ही घटना १५ दिवस जुनी असल्याचे समजले.
Madhya Pradesh Crime 3 Months Child Hot Rod Poked