इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात भ्रष्टाचार हा जणू काही शिष्टाचार झाला आहे. शासकीय कार्यालय असो की अन्य कोणत्याही ठिकाणी एखादे काम लवकर किंवा वेळेत पूर्ण करण्यासाठी इतकेच नव्हे कोणतेही काम करून घेण्यासाठी लाच देण्याचे आणि घेण्याची एक प्रकारे प्रथा पडली आहे. वास्तविक पाहता लाच घेणे आणि देणे हा कायद्यानुसार गुन्हा मानला जातो, तरीही सरासपणे लाचेची देवाण-घेवाण होतच असते. कधी ती टेबलाखालून होते तर कधी राजरोसपणे होते, या संदर्भात तक्रार केल्यावर अनेक अधिकारी आणि कर्मचारी रंगेहात पकडले देखील जातात. मध्य प्रदेशात एक गंभीर प्रकार घडला आहे. तलाठ्याने ५ हजाराची लाच घेतली. पण, समोर पोलिस दिसताच त्याने सर्व नोटा तोंडात कोंबल्या. हा प्रकार बघून सर्वजण आवक झाले. विशेष म्हणजे त्यामुळे या लाचखोराला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, तेव्हा कुठे त्या नोटा निघाल्या. आता या घटनेची सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगली आहे.
यासठी घेतली लाच
मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात बिल्हारी हलका गावातील तलाठी गजेंद्र सिंह यांनी कोणतेही काम फुकट करायचे नाही असा जणू काही नियमच केला होता, साहजिकच लोकांची ते लाचेसाठी अडवणूक करत असत, अशाच प्रकारे त्यांनी चंदन सिंह लोधी यांच्याकडे एका जमिनीच्या प्रकरणात ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे चंदनसिंग लोधी यांनी जबलपूर लोकायुक्त कमलसिंग उईके यांच्याकडे तक्रार केली. यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने घटनास्थळ गाठून तलाठीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. समोर पोलिस पाहताच तलाठी गजेंद्र सिंग याने लाचेच्या ५०० रूपयांच्या नोटा चक्क आपल्याच तोंडात कोंबल्या. हा प्रकार बघून सर्वच आश्चर्यचकित झाले.
अखेर तोंडातून नोटा बाहेर निघाल्या
एखादा माणूस पैसे खातो म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ न घेता तो भ्रष्टाचार करतो किंवा पैशाचा गैरव्यवहार करतो, तथा लाच घेतो असे म्हटले जाते, येथे तर तो चक्क पैसे (नोटाच) खात होता, ते पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना देखील आता काय करावे हे कळेना. तेव्हा लोकायुक्तांच्या ७ सदस्यांच्या पथकाने या त्याने खाल्लेल्या नोटा काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तोंडातून पैसे न काढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मोठया परिश्रमानंतर तलाठी गजेंद्र सिंग याने लाचेच्या चघळलेल्या नोटा बाहेर काढल्या.
अशी होणार कारवाई
दरम्यान, तक्रारदार चंदन लोधी यांच्या तक्रारीवरून लाचखोर तलाठी गजेंद्र सिंग याला ५ हजार रुपयांसह पकडण्यात आले. मात्र लोकायुक्त सदस्यांच्या पथकासमोर त्याने नोटा खाल्ल्या. त्यामुळे आता व्हॉईस रेकॉर्डिंगसह इतर पुराव्यांच्या आधारे सिंग याच्यावर कारवाई केली जात आहे.