नवी दिल्ली – देशात अनेक लोक बेपत्ता होतात. काही लगेच सापडतात, तर काहींना शोधण्यासाठी अनेक वर्षे जातात. शोध घेतल्यानंतरही अनेत महिने संबंधित व्यक्ती सापडलाच नाही, तर त्याचा शोध लागण्याची शक्यता खूपच कमी असते. असाच एक व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर तब्बल २३ वर्षांनंतर त्याच्या कुटुंबीयांना सापडला आहे.
मध्य प्रदेशमध्ये राहणारे प्रल्हाद सिंह २३ वर्षे पाकिस्तानच्या कारागृहात राहिल्यानंतर आपल्या घरी परतले आहेत. प्रोटोकॉल अधिकारी अरुणपाल सिंह यांनी सांगितले, की प्रल्हाद सिंह शिक्षा भोगल्यानंतर पंजाबच्या अटारी-वाघा सीमेतून भारतात परतले आहेत. अधिकारी सांगतात, मध्य प्रदेशातून एक पोलिसांचे पथक आणि त्यांचा लहान भाऊ वीर सिंह त्याला घरी नेण्यासाठी गेले होते. सागर जिल्ह्यातील प्रल्हाद हे मानसिक आजारी आहेत. ते बेपत्ता झाले तेव्हा त्यांचे वय ३० वर्ष होते.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना एका वृत्तपत्रातून त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. प्रल्हाद यांचे लहान भाऊ वीर सिंह म्हणाले, की ते पाकिस्तानात कसे पोहोचले याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. ते मानसिकरित्या अस्थिर असल्याने कोणालाही न सांगता घरातून जात होते. त्यांना खूपच त्रास देण्यात आला आहे. ते व्यवस्थितरित्या बोलू शकत नाही.