नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
एक हिरा निखळला- छगन भुजबळ
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधिमंडळातील माझे जुने सहकारी, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. व्यक्तिगत माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर सोबत आलेले एक महत्वाचे सहकारी आणि पक्षातील तत्कालीन आम्हा महत्वाच्या शिलेदारांपैकी ते एक होते. १९९५ ते १९९९ या काळात पिचड साहेब विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी आणि मी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळेस शिवसेनेचे सरकार होते आणि सरकारला अक्षरशः आम्ही सळो की पळो करून सोडले होते. ते माझ्या मोठ्या भावासारखे होते,वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं.
नाशिकमध्ये त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मी नुकतीच रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांचे पुत्र वैभव पिचड आणि डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर काही दिवसांच आलेल्या या बातमीमुळे मनाला तीव्र दुःख झाले आहे. ही बातमी समजताच वैभव पिचड यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे मोठ्या बंधूसमान असलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला मी कायमचा मुकलो आहे. तसेच त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजातील एक महत्त्वाचा नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला असून आदिवासी समाजाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगात मी व संपूर्ण भुजबळ कुटूंब पिचड कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच स्व. मधुकरराव पिचड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!