नवी दिल्ली – संशोधन आणि विकासात नवनवे शोध लावणाऱ्या सेंटियंट लॅब्सने भारतातील पहिल्या हायड्रोजनवर धावणार्या सेल बसचे अनावरण केले आहे. हे हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद), एनसीएल (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) आणि सीईसीआरआय (केंद्रीय वीज रासायनिक संशोधन संस्था) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.
सेंटियंटने जगातील पहिल्या इंधन तंत्रज्ञानाची घोषणा केली होती. या तंत्रज्ञानाद्वारे इंधन सेलवर चालणार्या वाहनांमध्ये कृषी अवशेषांचा वापर करून बसला ऊर्जा देण्यासाठी हायड्रोजन आणि हवेचा वापर केला जातो. बसमधून फक्त पाणी निघते. त्यामुळे पर्यावरणाचा विचार केला तर वाहतुकीसाठी सर्वात चांगले वाहन असू शकते. लांब पल्ल्याची रस्त्यावर धावणारी एक डिझेल बस साधारण वार्षिक १०० टन कार्बनचे उत्सर्जन करते. भारतात अशा दहा लाखांहून अधिक बस आहेत.
पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या हे तंत्रज्ञान सर्वात चांगले सिद्ध होऊ शकते. हायड्रोजन बनविण्याचे हे तंत्रज्ञान शेतकर्यांना अतिरिक्त पैसा कमविण्याचे चांगले माध्यम होऊ शकते. डिझेल बसमध्ये हायड्रोजन इंधनाची यंत्रणा बसवली तर हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळेल. याने तेलाचे आयातमूल्य कमी होईल.
सेंटियंट लॅब्सचे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले, आम्हाला स्वदेशात विकसित झालेल्या हायड्रोजन फ्यूल सेल पॉवर बसचे अनावरण करताना आनंद आणि अभिमान वाटत आहे. सीएसआयआर-एनसीएल यांच्या एका बळकट तंत्रज्ञान पथकाने हे काम पूर्ण केले आहे. ही हायड्रोजन मोहीम आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत गतिशिलतेला बळकट करण्यासाठी एक मोठा पल्ला गाठणार आहे. आमचे तंत्रज्ञान ऑटोमोबाईल कंपन्यांना भारतात झिरो कार्बन उत्सर्जन करण्यास प्रोत्साहन देईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.
सेंटियंट लॅब्सने बॅलेन्स ऑफ प्लांट, पॉवरट्रेन आणि बॅटरी पॅकचा आराखडा बनवून विकसित केले आहे. या सर्व घटकांना ९ मीटर लांब, ३२ सिटर वातानुकूलित बसमध्ये फिट करण्यात आले आहे. ३० किलो हायड्रोजन वापरून ४५० किलोमीटरपर्यंत धावण्यासाठी या बसची रचना करण्यात आली आहे. बसचा आराखडा बदलून तिची रेंजही वाढवली जाऊ शकते.