नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वे रक्तवाहिनी समजली जाते देशभरात चालणार्या हजारो रेल्वे गाड्या या लाखो प्रवाशांना दररोज एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जातात, यामध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट एक्सप्रेस यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे काही शाही रेल्वे गाड्या मात्र अत्यंत चकाचक असून त्या प्रवाशांना शाही प्रवासाचा आनंद देत असतात. या गाड्यांमध्ये बसण्याचे भाग्य लाभले म्हणजे एक प्रकारे पर्वणीच म्हणता येईल.
रॉयल किंवा राजशाही गाड्यांचा उल्लेख आपण अनेक ठिकाणी ऐकतो. भारतात, महाराजा एक्स्प्रेस, द डेक्कन ओडिसी, द गोल्डन रथ, रॉयल राजस्थान ऑन व्हील्स आणि पॅलेस ऑन व्हील्स सारख्या ट्रेन्स या पूर्णपणे शाही अनुभव देतात. या रेल्वे गाड्यांमधील ‘महाराजा एक्स्प्रेस ‘ चे नाव अनेकांना माहिती आहे, परंतु अन्य लक्झरी गाड्यांबाबत लोकांना फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या गाड्यांमध्ये आपण नवीन वर्षाची भव्य रॉयल सफर देखील करू शकता. या शाही रेल्वेगाड्यांविषयी जाणून घेऊ या…
महाराजा एक्सप्रेस
लक्झरी गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात प्रथम क्रमांकावर नाव येते ते महाराजा एक्सप्रेसचे. या ट्रेनमध्ये पर्यटकांना संपूर्ण रॉयल्टीसह प्रवास करण्याची संधी मिळते. या ट्रेनमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट, लाउंज बार, डिलक्स केबिन आणि ज्युनियर सूट सारख्या लक्झरी सुविधा मिळतात. सध्या तुम्ही ट्रेन बुकिंगसाठी IRCTC वेबसाइट www.the-maharajas.com वर जाऊन बुकिंग करू शकता. महाराजा एक्सप्रेसमध्ये चार प्रकारचे ट्रॅव्हल पॅकेजेस मिळतात, त्यासाठी आपल्याला वेगवेगळे भाडे द्यावे लागते. या ट्रेन हेरिटेज ऑफ इंडिया टूर अंतर्गत प्रेसिडेन्शियल स्वीट डबल बुक केले तर त्यासाठी 37,93,482 रुपये खर्च करावे लागतात. सर्व प्रकारचे टूर आणि भाडे देणगी वेबसाइटद्वारे घेता येते.
डेक्कन ओडिसी
सदर ट्रेन ही लक्झरी ट्रेन म्हणूनही गणली जाते. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही लक्झरी ट्रेन सन 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती. डेक्कन ओडिसी ही भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातील संयुक्त सहकार्य या द्वारे सुरू आहे. सदर ही आलिशान ट्रेन महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा समावेश करते आणि प्रवाशांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक देते. या ट्रेनमध्ये पर्यटकांना डायनिंग कार, सलून, बार लाउंज, मिनी जिम्नॅशियम, कॉन्फरन्स हॉल, आयुर्वेदिक स्पा अशा सुविधा मिळतात. www.deccan-odyssey-india.com वर जाऊन तुम्ही ट्रेनबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.
सुवर्ण रथ
दक्षिण भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. या लक्झरी ट्रेनमध्ये दक्षिण भारतातील अनेक पर्यटन स्थळांचा समावेश होतो, या प्रवासा दरम्यान संस्कृती आणि कला चांगल्या प्रकारे जाणून घेता येतात. सुविधा, बुकिंग आणि भाडे याबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही ट्रेनच्या www.goldenchariot.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.
पॅलेस ऑन व्हील्स
राजेशाही ट्रॉन्ससाठी पॅलेस ऑन व्हील्स हे सुप्रसिद्ध नाव आहे. ही ट्रेन राजस्थानच्या शाही स्थानाची ओळख दाखवते. त्यामुळे असे म्हणता येईल की, ही ट्रेन म्हणजे एक प्रकारचा फिरता राजवाडा आहे. यात सर्व प्रकारच्या शाही सेवा सुविधांचा आनंद घेण्याची संधी मिळते. ट्रेनच्या अधिकृत वेबसाइट www.palasonwheels.com वर जाऊन तुम्ही ट्रेनबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. रॉयल राजस्थान ऑन व्हील्स ट्रेन देखील या राजशाही ट्रेनचा एक भाग आहे.