मुंबई – ‘साधू महंत म्हणजे सर्व सुखीपासून आणि संसार मोहापासून त्याग’ अशी सर्वसाधारण प्रतिमा सर्वसामान्य माणसांच्या मनात असते. परंतु या प्रतिमेला तडा देण्याचे काम गेल्या काही वर्षात साधू मानल्या जाणाऱ्या तथाकथित लोकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना सर्व सुखांचा भोग आणि ऐश्वर्यापूर्ण जीवन हाच त्यांचा धर्म आहे की काय ? असे वाटावे. इतके हे तथाकथित साधू महंत आणि महाराज आपल्या सुख उपभोगात मध्ये रममान झालेले दिसून येतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा महंत आनंद गिरी यांच्या जीवनशैली वरून सर्व भारतीय जनतेला दिसून आला.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या त्यांचे शिष्य आनंद गिरी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अलाहाबादेतील बाघंबरी मठात नरेंद्र गिरी यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एकच खळबळ उडाली. कारण त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांचा कथित शिष्य आनंद गिरी याला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आल्यानंतर पोलिसांनी आनंद गिरी यांना अटक केली. यानंतर आनंद गिरी यांच्याबद्दल सगळीकडे चर्चा रंगली असून त्यांचे काही फोटो ‘हिरो स्टाईल’ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून आनंद गिरी अत्यंत सुखासिन जीवन जगत होते, असे दिसून येते आहे.
विशेष म्हणजे आनंद गिरी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून त्यांच्या फेसबुक पेजवर त्याच्या विदेश दौऱ्यातील अनेक फोटो आहेत. यामध्ये आनंद गिरी ब्रिस्बेन, पॅरिस, बर्लिन, लंडन तसंच अनेक ठिकाणी फिरायला गेलेला होते, असे दिसून येते. एका फोटोत आनंद गिरी आयफेल टॉवरच्या खाली उभा असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे आनंद गिरीला सुपरबाईक्स आणि महागड्या गाड्यांचीही आवड आहे.त्याच्या प्रोफाईलमध्ये त्याचे कार आणि बाईकसोबत अनेक फोटो आहेत. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलियात आनंद गिरीविरोधात दोन महिलांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, त्यात आनंद गिरी अटक झाली होती. तेव्हा नरेंद्र गिरी आपले शिष्य आनंद गिरी यांना वाचवण्यासाठी पुढे आले होते.
बाघंबरी मठाचे काही लोक सांगतात की, आनंद गिरी पूर्वी नरेंद्र गिरी यांचे सर्वात आवडते शिष्य होते. आनंद गिरी हे राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील असीम तालुक्यातील रहिवासी आहे. आनंद गिरी लहानपणी हरिद्वारला आले होते. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी ते प्रयागराजला आले. आणि त्यांनी नरेंद्र गिरीं यांच्या संरक्षणाखाली प्रयागराजमध्ये राहण्यास सुरुवात केली. कालांतराने आनंद गिरी महंत नरेंद्र गिरी यांच्या अगदी जवळ आले. इतकेच नव्हे तर संगमाच्या काठावरील हनुमानजींचे मंदिर असो किंवा बाघंब्री मठ, नरेंद्र गिरी यांना बडे महाराज जी आणि आनंद गिरी छोटे महाराज म्हटले जाऊ लागले.
बनारस हिंदू विद्यापीठातून पदवीधर शिक्षण घेतलेले हे आनंद गिरी वाघंबरी मठात नरेंद्र गिरींचा खास शिष्य झाले, परंतु आनंद गिरीच्या लाईफस्टाइलवरुन अनेकांनी नरेंद्र गिरी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात दरी निर्माण झाली.
२०२१ च्या सुरुवातीला आनंद गिरीने आपलेच गुरु नरेंद्र गिरी यांच्या विरोधात आरोप करत गुरूने मठाची जमीन बेकायदेशीर विकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरीला मठातून बरखास्त केले. मात्र नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या दोन महिने आधीच मठाकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये आनंद गिरीने आपल्या चुकांसाठी माफी मागितली आहे, असे सांगण्यात येते. आता हिरो सारख्या ऐष आरामात जीवन जगणाऱ्या आनंद गिरी यांचे पुढे काय होते हे काळच ठरवेल.