हैदराबाद – एकीकडे देशभरातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग हा अद्यापही आटोक्यात आला नसल्याने शासकीय आणि प्रशासकीय खर्चाला कात्री लावण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र तेलंगणा सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना अत्याधुनिक कार दिल्याने या निर्णयावर विरुद्ध जोरदार टीका होत आहे.
तेलंगणातील आयएएस अधिकाऱ्यांसाठी लक्झरी वाहने खरेदी केल्याबद्दल सरकारवर टीका केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी ३२ लक्झरी वाहने प्रगती भवनात पाठविण्यात आली. कोरोना परिस्थितीमुळे यंदा कमी महसूल आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या खर्चामुळे राज्याची तिजोरी बिकट आहे. परंतु असे असूनही सरकारने ही वाहने खरेदी केली. विशेष म्हणजे प्रत्येक वाहनाची किंमत २५ लाख रुपये आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका करीत भाजपचे प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निर्णयाचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविला. महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री जनतेचा प्रचंड पैसा वाया घालवत आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी केला. कृष्णा सागर राव पुढे म्हणाले की, कोविड -१९ आणि लॉकडाऊनमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा सहन करावा लागला आहे.
अधिक कर्ज उभे करण्यासाठी वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन आवश्यक आहे, लक्झरी कार खरेदीसाठी गुंतविलेल्या पैशांचा उपयोग बेड वाढविण्यासाठी किंवा गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी करता येऊ शकतो, असेही कृष्णा सागर यांनी सुचवले आहे. तसेच सखारने हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली असून सरकारला वाहन खरेदी थांबविण्यास सांगितले. कॉंग्रेसनेही या निर्णयावर टीका केली होती.