मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण ४७० गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लंपी नियंत्रणासाठी राज्यातील २२ जिल्ह्यातील बाधित गावांच्या परिसरातील २५३५ गावांमध्ये ७ लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री.सिंह म्हणाले, जळगाव २४, अहमदनगर १७, धुळे १, अकोला ५, पुणे ८, सातारा २, बुलडाणा ३, अमरावती ३ व वाशिम १ अशा ६४ बाधित जनावरे यामुळे दगावली.
१७५६ पशुधन उपचाराने बरे झाले
पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २५३५ गावातील एकूण ६,९७,९४९ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण ३५१९ बाधित पशुधनापैकी एकूण १७५६ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
लसमात्रा मोठ्या प्रमाणात उपलब्ध; बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण
लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी १६.४९ लाख लसमात्रा राज्यात उपलब्ध आहेत. १४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त ५ लाख लसमात्रा राज्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. आणखी ५० लाख लसमात्रा आठवडा भरात प्राप्त होत आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याचे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
Lumpi Skin Disease Vaccination 22 Districts