मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या अनेक राज्यात लम्पी संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला आहे. गायी, म्हशींसह जनावरांमध्ये होणारा हा रोग अधिक जलद गतीने फैलावत आहे. महाराष्ट्रात लम्पी स्कीन हा नियंत्रणात असला तरी राजस्थान, मध्यप्रदेश, गुजारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाबरोबर काही अफवाही पसरत आहेत. खासकरुन सध्याच्या काळात गाय किंवा म्हशीचे दूध खरेदी करावे की नाही, त्याचा आहारात समावेश करावा की नाही, मानवी आरोग्यावरही दूधामुळे काही परिणाम होतो आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात आता तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे.
राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आहे. परिणामी तेथील शहरी भागाच्या दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासून माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चे दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही तज्ज्ञ आणि प्रशासनाकडून केले जात आहे.
लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते ५ से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.
गायी व म्हैशीचे दूध स्वतःच एक पूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. जर दुधाला थंड पिण्याऐवजी, गरम करू सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सध्या जनावरांना लंबी आजार झाला तरी त्यांच्या दुधापासून काही धोका नाही, शंका वाटत असल्यास दूध जास्त उकळून घ्यावे तसेच त्यामध्ये हळद टाकावी असे तज्ज्ञांची मत आहे.
लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासून कुठलाही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा धोका कमी आहे.
पशुपालन हे अनेक शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात ५७ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. १५ राज्यातील १७५ जिल्ह्यांमध्ये १५ लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.
या आजाराचा सामना करण्यासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये २३४६ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली. तर १४३ जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. नगर, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, पुणे या जिल्ह्यामध्ये फैलाव झाला आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. या आजारामुळे राज्यात आतापर्यंत ४२ जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहेत.
लम्पीचा सर्वाधिक धोका राजस्थानात निर्माण झाला असून तेथे आतापर्यंत ७५ हजार गायी-म्हशी ह्या दगावल्या आहेत. राजस्थान पाठोपाठ गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे.
लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. हा आजार फक्त गाय आणि म्हशींनाच होतो. या आजारात गाई म्हशींना खूप ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. तसेच जनावरे लंगडतात देखील आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ मोठ्या गाठी येतात. या गाठी काखेला, मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. तसेच त्या सर्व अंगावर देखील पसरू शकतात. एवढेच नाही तर जनावरांच्या अंतर्गत भागांमध्ये देखील गाठी येतात.
आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किनचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली असून सर्व शेतकरी व पशुपालकांना प्राण्यांचे त्वरित लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांमध्येही या आजराशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो.
लम्पी त्वचा रोग भारतात वेगाने पसरत असला तरी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी माहिती दिली आहे की लम्पी त्वचा रोग मानवामध्ये पसरत नाही. जर हा आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असल्यासही मानवामध्ये हे संक्रमण होत नाही. लम्पी त्वचा रोगामुळे मृत्यू दर १ ते २ टक्के आहे. लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये उपाययोजना तसेच लसीकरण करण्यात येत आहे. सध्या लंपीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.या आजारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
लम्पी या विषाणू ची भारतामध्ये सर्वप्रथम २०१९ मध्ये लागण झाल्याचे दिसून आले. या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरीरावर छोट्या गाठी यायला लागतात. जानावर दूध कमी देते, यामुळे लम्पीची लागण झालेल्या जनावरांना वेगळे ठेवा, माशा, डास, गोचीड यांना मारून टाका. जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर न सोडता पुरून टाकावा किवा जाळून टाकावा. संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फवारावे, अशा सूचना कृषी, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने केल्या आहेत.
Lumpi Skin Disease Milk Purchase Confusion Expert Says