मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजअखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण ३०३० गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख ४३ हजार ०८९ बाधित पशुधनापैकी एकूण ९३ हजार १६६ पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
श्री.सिंह म्हणाले, बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३५,.५८ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात असून, जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार सुमारे 97 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.
श्री.सिंह म्हणाले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.
Lumpi Skin Disease Current Status