विशेष प्रतिनिधी, मुंबई
सीआयएसएफचे महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आता सीबीआयचे नवे प्रमुख असतील. नवे सीबीआय प्रमुख निवडण्यासाठी ज्या तीन नावांचा विचार करण्यात आला होता त्यात महाराष्ट्र कॅडरचे जायस्वाल सर्वांत वरीष्ठ असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे मानले जात होते. केंद्र सरकारच्या वतीने त्यांना मंगळवारी रात्री सीबीआय संचालक म्हणून जबाबदारी देत असल्याची माहिती देण्यात आली.
सीबीआय संचालकाचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी असणार आहे. गेल्या फेब्रुवारीत आर.के. शुक्ला निवृत्त झाल्यानंतर देशातील सर्वांत मोठ्या तपास यंत्रणेचे प्रमुख पद रिक्त होते. गेल्या चार महिन्यांपासून सीबीआयचे अपर संचालक प्रवीण सिन्हा अस्थायी स्वरुपात तपास यंत्रणेच्या संचालकपदाची धुरा सांभाळत होते. जायस्वाल यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६२ चा असून ते १९८५ च्या बॅचचे आयपीएस आहेत. महाराष्ट्र कॅडरचे असल्यामुळे ते मुंबईत पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्रात डीजीपीदेखील राहिलेले आहे. ते नऊ वर्षे रॉमध्ये (रिसर्च अँड अॅनालिसीस विंग) होते. त्यांनी रॉमध्ये अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे. सीबीआयच्या नव्या संचालकाची निवड करण्यासाठी ज्या तीन नावांचे पॅनल तयार करण्यात आले होते त्यात जायस्वाल सर्वांत वरीष्ठ होते. इतर दोघांमध्ये गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस.के. कौमुदी आणि एसएसबीचे महासंचालक के.आर. चंद्रा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अंमलात आलेल्या एका नियमामुळे स्पर्धेत असलेली इतर दोन नावे पहिलेच बाहेर पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी सीबीआय संचालकाची नियुक्ती करण्यासाठी उच्चाधिकार समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश एन.व्ही. रामण यांनी सहा महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ असलेल्यांना डीजी स्तरावर नियुक्त न करण्याच्या नियमांचा उल्लेख केला. त्यामुळे सीबीआय संचालक होण्याचे सर्वांत प्रबळ दावेदार राकेश अस्थाना आणि वाय.सी. मोदी पहिलेच बाहेर पडले.
सुबोध जायस्वाल सदैव चर्चेत
सुबोध जायस्वाल यांनी एका दशकापेक्षा अधिक कालावधी इंटेलिजन्स ब्युरो, एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) आणि रॉ यासारख्या संस्थांमध्ये काम केले आहे. तेलगी घोटाळ्याच्या तपासानंतर ते चर्चेत आले होते. त्यावेळी ते राज्य राखीव पोलीस दलाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये काम करताना अनेक दहशतवाद विरोधी अभियानांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.