विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जर तुम्ही स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एलपीजी सिलिंडर वापरणार्यांना एक खास सुविधा दिली आहे. ग्राहकांना आता सिलिंडर रिफिल (पुनर्भरण) करण्यासाठी वितरकाची निवड करता येणार आहे. ही परवानगी देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील गॅस कंपनीच्या कोणत्याही वितरकाची निवड करता येणार आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या रूपाने ही सुविधा चंडीगड, कोयम्बतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे सुरू करण्यात येणार असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले.
लाभ असा घ्यावा
एलपीजी ग्राहकांना नोंदणीकृत लॉग इनचा वापर करून मोबाई अॅप किंवा ग्राहक पोर्टलद्वारे गॅस रिफिल बुकिंग करताना त्यांना वितरकांची यादी रेटिंगसह दिसणार आहे. आपल्या क्षेत्रातील उपलब्ध कोणत्याही वितरकाला ग्राहक निवडू शकणार आहे. या सुविधेमुळे ग्राहक सशक्त होतीलच. शिवाय सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच त्यांचे रेटिंग सुधारण्यासाठी वितरकांमध्ये प्रतिस्पर्धा निर्माण होईल.
डिजिटल एलपीजी सेवा
डिजिटल इंडिया अभियानाला पुढे नेताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयांतर्गत गॅस पुरवठा कंपन्या ग्राहकांना सोपी डिजिटल सेवा देण्यासाठी आपल्या सुविधांमध्ये बदल करत आहेत. कोविडमुळे नवे निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर संपर्काविना व्यवहार करण्याची गरज वाढत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून तेल कंपन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना रिफिल बुकिंग करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहारासाठी विविध डिजिटल सुविधा दिल्या आहेत.