मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया-युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाची झळ आता जगासह भारतात दिसून येऊ लागली आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास जी शक्यता वर्तविण्यात येत होती, ती खरी होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आता इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्याची सुरुवात गॅस सिलिंडरपासून झाली आहे. १ मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सिलिंडरचे दर १०५ रुपयांनी वाढले आहेत. परंतु ही वाढ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाली आहे. ७ मार्चनंतर घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती सिलिंडरचे दर वाढल्यास आगीत तेल ओतल्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.
६ ऑक्टोबर २०२१ नंतर घरगुती एलपीजी सिलिंडर स्वस्तही झाले नाही आणि महागही झाले नाही. तथापि यादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती १०२ डॉलर प्रतिपिंपच्या वर गेल्या आहेत. यादरम्यान व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये चांगलाच बदल पाहायला मिळाला आहे. ऑक्टोबर २०२१ पासून एक फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरचे दर १७० रुपयांनी वाढले. दिल्लीत १ ऑक्टोबरला व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७३६ रुपये होते. तेच नोव्हेंबरमध्ये २००० रुपये आणि डिसेंबरमध्ये २१०१ रुपये झाले होते. जानेवारीमध्ये सिलिंडर स्वस्त झाले, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये आणखी स्वस्त होऊन १९०७ रुपये झाले आहेत.
या वेळी सुद्धा व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडर १ मार्च म्हणजेच आजपासून दिल्लीमध्ये १९०७ रुपयेऐवजी २०१२ रुपयांत मिळणार आहे. कोलकातामध्ये ते १९८७ रुपयांऐवजी २०९५ रुपयांत मिळणार आहे. तर मुंबईत सिलिंडरचे दर १८५७ रुपयांवरून वाढून १९६३ रुपये झाले आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना दिलासा मिळाला असला तरी आता अनुदानित सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती १०२ डॉलर प्रतिपिंप पार झाल्यानंतरही ६ ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नव्हती. आता ७ मार्चनंतर निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर अनुदानित सिलिंडर १०० रुपयांपासून २०० रुपयांहून अधिक प्रति सिलिंडर वाढण्याची शक्यता आहे.