मुंबई – मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये अन्न शिजवण्यासाठी आजच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर सर्वच घरांमध्ये आवश्यक वस्तू म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडर होय. परंतु या सिलेंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला असून गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. १ सप्टेंबरला सिलेंडरचे दर वाढल्यानंतर येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
आधीच इंधनाच्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून त्यापाठोपाठ खाद्य तेलाच्या किमती देखील भडकल्या आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात आता या नवीन दरवाढीमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. १५ दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाले आहे.
विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसात २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दि. १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. आता दिल्ली शहरात १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली असून ८८४.५० रुपये झाली आहे. दरम्यान, यापुर्वी जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मात्र मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता.
एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये ६९४ रुपये होती, तर १ फेब्रुवारीमध्ये ती वाढवून ७१९ रुपये प्रति सिलेंडर झाली. पुन्हा १५ फेब्रुवारीला किंमत वाढवून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये करण्यात आली. तसेच मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.
दिल्ली शहराप्रमाणेच मुंबई शहरात देखील १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली असून ८८४.५० रुपये झाली आहे. तर कोलकत्ता मध्ये सिलेंडरची किंमत ९११ रुपये असून चेन्नईमध्ये ९०० रुपये इतकी आहे. या चार मेट्रो शहरांप्रमाणेच भारतातील अन्य शहरांमध्ये देखील एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये सुमारे २५ ते ५० रुपयांची वाढ झालेली दिसून येते.