नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तेल मार्केटिंग कंपन्यांनी नव्या घरगुती एलपीजी गॅस जोडणीसाठी सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) म्हणून आकारली जाणारी रोख रक्कम वाढविली आहे. कंपन्यांनी ही रक्कम ७५० रुपयांनी वाढविली असून, ग्राहकांना आता प्रत्येक जोडणीसाठी १,४५० रुपयांऐवजी २२०० रुपये जमा करावे लागणार आहेत. ही रक्कम आज (१६ जून) पासून लागू होणार आहे.
एलपीजी गॅसची नवी जोडणी घेताना १४.२ किलोच्या दोन सिलिंडरवर आता ४,४०० रुपये सुरक्षा ठेव म्हणून द्यावे लागणार आहेत. गॅस रेग्युलेटरची किंमत १५० रुपयांवरून वाढवून २५० रुपये करण्यात आली आहे. पाच किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरची सुरक्षा ठेवही वाढविण्यात आली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पाच किलोच्या सिलिंडरसाठीची सुरक्षा ठेव आता ८०० रुपयांऐवजी १,१५० रुपये करण्यात आली आहे. नव्या जोडणीसोबत मिळणाऱ्या पाइप आणि पासबुकसाठी प्रत्येक १५० आणि २५ रुपये द्यावे लागणार आहेत.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना नव्या दरांमुळे फटका बसणार आहे. जर या ग्राहकांनी आपल्या जोडणीद्वारे सिलिंडर वाढविले कर दुसऱ्या सिलिंडरवर सुरक्षा ठेवीची वाढलेली रक्कम द्यावी लागणार आहे. जर उज्ज्वला योजनेत एखादी नवी जोडणी मिळाली तर आधीचीच सुरक्षा ठेव द्यावी लागेल.
तुम्ही नव्या गॅस सिलिंडरची नवी जोडणी घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला ३६९० रुपये भरावे लागतील. तुम्हाला शेगडी घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे जोडणी महाग झाल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.