नवी दिल्ली – प्रत्येक स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण त्यामुळेच रोजचा स्वयंपाक वेळेवर तयार होऊ शकतो. काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यासाठी अनेक घरांमध्ये दोन (डबल) सिलेंडरची व्यवस्था असते. परंतु ज्यांच्याकडे एकच सिलेंडर आहे किंवा वेळेवर सिलिंडर मिळत नाही, त्यांची मात्र मोठी अडचण निर्माण होते. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण आपल्याला आता एखाद्या दुकानातून देखील येत्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरही खरेदी करता येणार आहे. कारण, आता केंद्र सरकार लहान एलपीजी सिलेंडरच्या किरकोळ विक्रीला मान्यता देऊ शकते. केंद्राच्या एका वरिष्ठ शासकीय अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, फेअर प्राइस शॉप (FPS) वर विक्रीला परवानगी देण्याची योजना आखली जात आहे.
फेअर प्राइस शॉप योजना
FPS द्वारे लहान LPG सिलिंडरची किरकोळ विक्री करण्याची योजना विचाराधीन आहे, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. देशभरात सुमारे 5.26 लाख रेशन दुकान म्हणजेच स्वस्त धान्य दुकाने आहेत. याद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरीब लाभार्थ्यांना अनुदानित अन्नधान्य वितरित केले जात आहे.
मुद्रा कर्ज
केंद्र सरकार फेअर प्राइस शॉप (FPS) डिलर्सना मुद्रा कर्ज देण्याची योजना करत आहे. तसेच यासंदर्भात राज्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. अन्न सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारांसोबत झालेल्या आभासी बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांव्यतिरिक्त, वित्त आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे प्रतिनिधी देखील बैठकीत सहभागी झाले होते.
यांच्यासमवेत चर्चा
सरकारच्या नवीन छोट्या गॅस सिलिंडर देण्याच्या योजनेबाबत ऑइल कॉर्पोरेशन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चर्चा झाली यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) तसेच CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSC) चे अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.