नवी दिल्ली – भारत ही अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक खेळाडूंची खाण आहे. अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू दडले असल्याचे वारंवार समोर येते. आताही अशीच एक बाब स्पष्ट होत आहे. घरची हालाखीची परिस्थिती आणि अत्यंत तोकड्या सुविधा असल्या तरी त्यावर मात करत एका महिला खेळाडूने जगभरात भारताचे नाव झळकविण्याचा पराक्रम केला आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सध्या तिचा मोठा बोलबाला आहे.
लव्हलिना बोर्गोहेनने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. तिने माजी विश्वविजेती असलेल्या खेळाडूचा पराभव केला आहे. प्रत्येक आसामी नागरिकांसाठीच केवळ नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी हा आनंददायी क्षण आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारो मुखिया गावातील ही तरुणी आहे.
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये महिलांच्या वेल्टरवेट गटात उपांत्य फेरीत मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनने प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतासाठी तिच्या रुपाने एक पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी आणि आता टोकियो २०२० मध्ये भारतासाठी पदक निश्चित करणारी ती आसामची पहिली महिला मुष्टियोद्धा आहे.
लव्हलिनाची लढाऊ वृत्ती आणि कधीही-हार न मानण्याची वृत्ती सर्वश्रुत आहे. लॉकडाऊन दरम्यान बर्याच जणांनी गॅस सिलिंडरसह प्रशिक्षण घेत असलेली लव्हलिना पाहिली आहे. लव्हलिनाचा प्रवास पुढील आठवड्यात होणाऱ्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे.