इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेम ही जगातले सर्वश्रेष्ठ भावना आहे, असे म्हटले जाते. त्यात पती-पत्नीचे प्रेम तर अत्यंत पवित्र मानले जाते. दोघे एकमेकांसाठी वाटेल ते करण्यास तयार होतात, असे अनेक प्रसंगातून दिसून येते, असाच एक प्रसंग नुकताच घडला. यामध्ये एक व्यक्ती थायलंडहून बोट घेऊन भारतात राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी बाहेर पडला आहे. तथापि, जेव्हा तो थायलंडच्या किनाऱ्यापासून ५० मैल दूर गेला, तेव्हा थायलंडच्या नौदलाला कळले. अटकेनंतर चौकशीत हा माणूस व्हिएतनामचा असून तो सुमारे दोन आठवडे समुद्राच्या मध्यभागी फिरत होता.
थायलंडच्या नौदलाच्या माहितीनुसार व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव हो हुआंग हंग आहे. रबर कयाकच्या साहाय्याने फुकेत या थायलंडच्या हॉलिडे बेटावरून तो निघाला होता. हो हुआंग हंगची पत्नी मुंबईत राहते आणि तिला भेटण्यासाठी तो रबर कयाकमध्ये पाणी आणि नूडल्स घेऊन प्रवासाला निघाला.
नौदलाच्या म्हणण्यानुसार, फुकेत बेट सोडून थायलंडपासून ८० किमी अंतरावर असलेल्या सिमिलन बेटाजवळ पोहोचला होता. हो हुआंग हुआंग कोणत्याही नेव्हिगेशन सिस्टमशिवाय निघून गेले होते. त्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी नौदलाच्या मरीन सिक्युरिटी युनिटला दिली. माहितीनंतर नौदलाने हो होआंग हंगची सुटका केली.
हो हुआंग हंगने मुंबईत काम करणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी फुकेतहून २,००० किमीचा धोकादायक प्रवास केला. कोविड-१९ महामारीच्या निर्बंधांमुळे ते गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना भेटू शकले नाहीत. थाई मेरिटाइम एन्फोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सॉन्गटन यांच्या मते, हो होआंग हंगकडे कोणतेही नकाशे, कंपास, जीपीएस किंवा कपडे नव्हते आणि फक्त मर्यादित पाणी होते.
कॅप्टन पिचेट सॉन्गटान यांनी सांगितले की, होआंग आधी बँकॉकला गेला होता पण त्याला कळले की तो व्हिसाशिवाय भारतात जाऊ शकत नाही. निराश होऊनच त्याने बसने फुकेत गाठले आणि त्यानंतर त्याने एक रबर कयाक विकत घेतला. हो होआंगने ५ मार्च रोजी फुकेत किनारपट्टी सोडली होती परंतु तो वादळी वाऱ्यात अडकला होता. आम्ही व्हिएतनामी दूतावास तसेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.