नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगजित सिंग यांच्या गाण्यातील ‘ना उम्र की सीमा हो’ एवढ्याच एका ओळीचा आदर्श घेऊन एक जोडपं आपापली घरं सोडून पसार झालं. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अगदी सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत २३ वर्षाच्या शिक्षिकेने पळून जावे, एवढं ते आंधळं असतं, याची प्रचिती देणारी एक घटना अलीकडेच नोएडात घडली.
खरं तर असं काही ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या पाश्चिमात्य देशात आहोत, असा विचार मनात येतो. कारण अल्पवयीन विद्यार्थ्यांना शिक्षिका आवडणे आणि त्या शिक्षिकेसोबत पळून जाणे यात जे अंतर आहे, ते एकेकाळी भारताच्या आणि पश्चिमेकडील देशांच्या संस्कृतित होते. आता मात्र ही दरी जवळपास दूर होताना दिसत आहे. नोएडामध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका एकाच वस्तीत राहातात. शिक्षिका घरोघरी जाऊन ट्युशन क्लास घेते. ती या १६ वर्षीय विद्यार्थ्याकडेही यायची. शिक्षिकेकडून अभ्यासाचे धडे घेता घेता कधी त्याने प्रेमाचे धडे घ्यायला सुरुवात केली, कळलेच नाही. आणि एक दिवस दोघेही अचानक गायब झाले. अर्थात मुलाच्या बापाच्या तक्रारीमुळे सेक्टर ११३ च्या पोलिसांनी शिक्षिकेविरुद्धच गुन्हा नोंदवला. पण प्रकरण प्रेमातून घडले आहे, याचीही दखल पोलिसांनी घेतली आहे.
जवळीक वाढली
विद्यार्थी आणि शिक्षिका यांना बऱ्यापैकी एकांतात वेळ घालवायला मिळायचा. कारण ट्युशन क्लास सुरू असल्यामुळे कुणीही डिस्टर्ब करायला यायचे नाही. अश्यात १६ वर्षाचा बालक शिक्षिकेच्या प्रेमात आकंठ बुडाला आणि शिक्षिकाही त्याच्यावर प्रेम करू लागली. या दोघांमध्ये जवळिक वाढत असल्याचा साधा अंदाजही कुणाला आला नाही.
मावशीकडे जातो म्हणाला
मुलाच्या बापाने पोलिसांत तक्रार देताना शिक्षिकेने फूस लावून आपल्या मुलाला पळवून नेल्याचे म्हटले आहे. मुलगा रात्री दीडच्या सुमारास मावशीकडे जातो, असे सांगून घराबाहेर पडला, मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही, असे बापाने म्हटले आहे.
Love Story 23 Year Old Teacher Fly Away With 16 Year old Student