नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने विविध संस्था आणि संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. आज, २८ नोव्हेंबर रोजी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाबाबत सध्या विविध संस्था आणि संघटनाच्या बैठका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. शहराच्या विविध भागातून आंदोलकांचे जत्थे येणार आहेत.
सकल हिंदू समाजाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी नाशिकमधील हिंदू संघटना सोमवार दिनांक २८ रोजी रस्त्यावर उतरणार आहे. शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक २५ रोजी वरद लक्ष्मी लॉन्स संभाजी नगर रोड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यापक बैठक संपन्न झाली. येत्या सोमवारी बी. डी. भालेकर मैदानावरून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाचे नियोजन करण्यात आले धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात येणार आहेत.
Love Jihad Nashik Muk Morcha Sakal Hindu Samaj