मुंबई – ‘ना उम्र की सीमा हो ना प्यार का हो बंधन’ या जगजीतसिंगच्या आवाजातील ओळी ऐकून अनेकांच्या मनात प्रेमाला व वयाला बंधन नकोसारख्या गोष्टी येतात. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे अनेक लोक आहेत, याची आपण अनेकदा प्रचिती घेतली आहे. चंदीगडमधील असेच एक प्रेमप्रकरण सध्या चर्चेत आहे. या कहाणीतील प्रेयसीचे वय १९ वर्षे आहे आणि प्रियकराचे वय ६७ वर्ष आहे. अर्थात प्रियकर जवळपास सत्तरीच्याच उंबरठ्यावर आहे. हे प्रकरण कुठल्या कारणाने उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा याचा तपास करण्यात आला. पण या कहाणीत काहीच गौडबंगाल नसून दोन्ही बाजूंनी खरे प्रेम आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
पलवल शहरातील एका मुस्लीम प्रेमी युगुलाने कुटुंबियांपासून जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा प्रदान करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. आमचे एकमेकांवर प्रेम असून आम्हाला एकत्र राहायचे आहे, पण कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे त्यांच्यापासून जीवाला धोका आहे, असे या युगुलाने न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाने संशय घेत पोलिसांना एक टीम तयार करून तपास करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी तरुणीला सुरक्षितरित्या न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आणून तिचे बयाण नोंदविण्याचेही आदेश दिले.
तरुणीवर दडपण नाही
तरुणीवर कुठलेही दडपण नसल्याचे पोलिसांनी आपला रिपोर्ट न्यायालयात सादर करताना सांगितले. हा दिल का मामला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तरुणीने तर आपल्या आईच्या सहमतीनेच विवाह केला असल्याचे बयाण नोंदविले आहे. मात्र घटस्फोट न घेताच तिचा पती दुसऱ्या महिलेसोबत राहतो, असेही तिने सांगितले. दुसरीकडे ६७ वर्षांच्या काकांना ७ मुलं असून साऱ्यांचीच लग्न झालेली आहेत. पण त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे, असेही पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.