बंगळुरू – पवनपुत्र हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी येथील असल्याचे आतापर्यंत मानण्यात आले आहे. परंतु आता भगवान हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दाव्यावर कर्नाटकमधील तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून हंपी (पूर्वाश्रमीचे किष्किंधा) येथे हनुमानाची अनेक मंदिरे असून तेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा प्रतिदावा केला आहे.
तिरुमलाच्या पर्वतांवर भगवान हनुमानाचे निवसस्थान असून याबाबत एक पुस्तिका प्रकाशित करणार असल्याचा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) केला होता. आता यावर धार्मिक आणि पुरातत्व क्षेत्रात वादाचे मोहोळ उठले आहे. पुरातत्व क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतिहासकारांनी टीटीडीचा हा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी टीटीडीने विद्वान आणि धर्मप्रमुखांशी चर्चा केली पाहिजे, अशी भूमिका कर्नाटकमधील विश्व हिंदू परिषदेच्या शाखेने घेतली आहे.
कर्नाटकमधील लोक बेल्लारीजवळच्या हंपीला अनेक वर्षांपासून किष्कींधा क्षेत्र किंवा वानरांचा प्रदेश मानला जातो. हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या सात पर्वतांपैकी एक असलेल्या पर्वतावर झाला, असा दावा करत ही बाब सिद्ध करण्यासाठी एक पुस्तिका प्रकाशित करणार असल्याचे टीटीडीने म्हटले होते. तिरुमला पर्वतरांगेत वेंकटेश्वरचे मंदिरही आहे.









