नाशिक – जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतू कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोकशाही दिनासाठीचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या व्हॉट्सअप 9421954400 या क्रमांकावर, सादर करण्याचे आवाहन नाशिक महसूल विभागाचे तहसिलदार राजेंद्र नजन यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टसींगच्या नियमांचे पालन होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा टपालाद्वारे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरीकांनी तक्रार अर्ज सादर करावे. तक्रार अर्ज करतांना तो विहिती नमुन्यात असावा तसेच तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाची असावे, असेही शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
लोकशाही दिनासाठी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व किंवा अपिल्स, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति न जोडलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असेही तहसिलदार राजेंद्र नजन यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.