नवी दिल्ली – भारतीय लोकसाहित्य परंपरेचे पुनरुज्जीवन करून स्त्री पुरुष समानता आणि बालिकांचे संरक्षण अशासारख्या सामाजिक कार्यासाठी लोकसाहित्याच्या क्षमतांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले. विविध पारंपारिक लोक साहित्याची लोकप्रियता हळूहळू कमी होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. विविध पारंपारिक लोककला प्रकार सादर करणारे समुदाय हळूहळू नाहीसे होत आहेत असे त्यांनी सांगितले. अशा समुदायातील कुटुंबांमधील तरुण वर्गाने यातील प्रशिक्षण घेऊन कौशल्ये आत्मसात करावीत असे ते म्हणाले. या युवकांनी सामाजिक बदलासाठी लोककला माध्यमाचा अंगीकार करावा असे सांगितले.
आपल्या देशातील लोककला परंपरेचा एक संपन्न डेटाबेस निर्माण करण्याच्या आवश्यकतेवरही नायडू यांनी भर दिला. भारतीय लोककला परंपरांशी संबंधित एका सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी आपला महान इतिहास आणि लोक कलांचे समृद्ध वैविध्य तसेच भारतातील मौखिक परंपरा या सर्व बाबी अधोरेखित करत त्यांना लोकप्रिय करण्याचे आवाहन केले.भारतात पूर्वीच्या काळात लोककथांना मोठ्या प्रमाणावर बहर येण्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात त्यांना मिळणारी मोकळीक. आपली पारंपारिक मुल्ये आणि सांस्कृतिक परंपरा ग्रामीण जीवनप्रवाहात गुंफली गेली आहेत असेही त्यांनी नमूद केले.
“या संस्कृतीला संरक्षण दिले गेले पाहिजे कारण आपली ही मूलभूत सांस्कृतिक परंपरा हरवली तर ती पुन्हा मिळवता येणार नाहीत”, असेही त्यांनी सांगितले. लोकसाहित्याचे पुनरुज्जीवन आणि नव्या पिढीला त्याबाबत माहिती देण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये या विषयावर वार्षिक कार्यक्रम आयोजित करून लोककला प्रकारांना प्रोत्साहन दिले जावे असेही त्यांनी सुचवले. ऑनलाइन आणि डिजिटल मंचाचा योग्य वापर करत आपल्या लोककला प्रकारांना पुनरुज्जीवित करावे असे ते म्हणाले. दूरदर्शन आणि आकाशवाणी सारख्या सार्वजनिक प्रक्षेपणाच्या माध्यमातून या लोककलांवर आधारित कार्यक्रमांना महत्त्व दिले जायला हवे, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने कर्नाटक लोकसाहित्य विद्यापीठाची स्थापना केल्याबद्दल त्यांनी यावेळी कर्नाटक सरकारची प्रशंसा केली. कर्नाटक जानपद विश्वविद्यालय असे नाव असलेले हे विद्यापीठ लोकसाहित्याचा अभ्यास आणि संशोधन यांना समर्पित आहे.