मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देश भाजपमय होण्यासाठी या पक्षातील अगदी वरिष्ठ पातळीवरील केंद्रीय नेतृत्वापासून ते गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी जणू काही चंग बांधलेला दिसून येतो. त्यासाठी आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. विशेषतः सुमारे दोन वर्षानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी भाजपाने जबरदस्त नियोजन टाकले आहे असे सांगण्यात येते. भाजपनं २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
विशेष म्हणजे राज्यात भाजप ने ज्या १६ लोकसभा मतदारसंघात युतीत शिवसेना निवडणूक लढवत असल्यामुळे कधीही निवडणूक लढवली नाही त्या मतदार संघाच्या ठिकाणी भाजपनं लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं मास्टर प्लान आखला आहे. भाजपनं एका मतदारसंघाची जबाबदारी एका नेत्याकडे दिली आहे.
विशेषतः दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अमरावती, नाशिक, शिरूर यासह सोळा लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजप नेत्याकडे जबाबदारी दिली जाईल. त्यासंदर्भातच देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्या सह सोळा लोकसभा मतदारसंघ जिथे तयारी करायची आहे तिथले भाजपाचे स्थानिक नेते नियोजन करणार आहेत.
देशात ११३ लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात १६ लोकसभा मतदारसंघ निवडण्यात आले. जिथे भाजप यापूर्वी निवडणूक लढवली नाही आणि जिंकलेली देखील नाही या मतदारसंघांमध्ये भाजपा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवणार आहे. तसेच यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बूथ कमिटी नेमून भाजप सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार येईल.
भाजप व कायम वेगवेगळ्या निवडणुकीची तयारी करत असते, भविष्यात भाजप अधिक प्रबल होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे काम आजच्या बैठकीत चर्चा केली जाईल. एकीकडे विविध मुद्द्यांवरून देशातील आणि राज्यांतील राजकारण तापलेले असताना, दुसरीकडे मात्र भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात स्थानिक स्वराज्य संस्था, विविध ठिकाणच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासून जबरदस्त प्लानिंगला सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्र्यांकडे देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी ९ केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत. या प्रवासात कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर विशेष भर दिला जाणार आहे. याच लोकसभा मिशनची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. १८ महिन्यांचा हा प्रवास असेल. या १८ महिन्यांच्या कालावधीत ६ वेळा केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. प्रत्येक प्रवास हा ३ दिवसांचा मुक्कामी प्रवास असणार आहे. या ३ दिवसांच्या प्रवासात २१ कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.
त्यातच या ३ दिवसीय मुक्कामी प्रवासात कल्याण लोकसभेत आणि मध्य मुंबईत केंद्रीय मंत्री अनुरागसिंग ठाकूर, दक्षिण मुंबईमध्ये नारायण राणे, पालघरमध्ये विश्वेश्वर तुडू, रायगड आणि शिर्डी मतदारसंघात प्रल्हाद पटेल, बारामतीला निर्मला सीतारमण, औरंगाबाद आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भूपेंद्र यादव, चंद्रपूरला हरदीपसिंग पुरी या केंद्रातील प्रभावी मंत्र्यांवर संबंधित लोकसभा मतदार संघाची जबाबदारी असणार आहे.
विशेष म्हणजे या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडी अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत. केंद्र सरकारकडून राबवलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जागोजागी जातील.
या कार्यक्रमांमध्ये धार्मिक स्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरुंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील डॉक्टर यांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानातही केंद्रीय मंत्री भेट देणार आहेत.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने मिशन २०२४ हाती घेतले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे मंत्री त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघांत जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि रणनीती आखतील. सन २०१९ मध्ये भाजपचा १४ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपनं चार समूह तयार केले आहेत.
एकीकडे नरेंद्र मोदी सरकार आठवी वर्षपूर्ती साजरी करत असतानाच, भाजपाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तयारी सुरु केली आहे. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आणण्यासाठीची रणनीती ठरवण्याचे काम भाजपाने सुरु केल्याची माहिती आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी काही मोजक्या केंद्रीय मंत्र्यांची, पक्षाचील प्रभारी व्यक्तींची आणि खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत प्रत्येक खासदाराची निवडणुकीची जबबदारी या बैठकीत निश्चित करण्यात आली.
सध्या लोकसभेत असलेल्या ज्या खासदारांचा जन्म १९५५ सालानंतर झाला आहे, त्यांनाच लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत तिकीट दिले जाईल, अथवा त्यांच्याच नावाचा प्राथमिक विचार करण्यात येईल, असे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरले असल्याची माहिती आहे. १९५५ पूर्वी जन्मलेल्या खासदारांना तिकिट देण्यात येणार नाही. किंवा तिकिट वाटपात त्यांच्या नावांचा विचारच होणार नाही, अशी भूमिका ठरली आहे. थोडक्यात ज्यांचे वय सत्तरीच्या वर असेल अशा नेत्यांच्या नावांचा तिकिटांसाठी विचार होणार नाही.
२०२४ च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराकडे कमकुवत असलेल्या १०० तर आमदाराकडे कमकुवत असलेल्य २५ बूथची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. देसभरात अशा ७४ हजार कमकुवत बूथची यादी तयार करण्यात आलेली आहे. हे बूथ, कार्यकर्ते आणि मतदार मजबूत करावेत, ही जबाबदारी खासदार आणि आमदारांवर असणार आहे. याकामात संघाचीही मदत घेतली जाणार आहे.
Loksabha Election Maharashtra Strategy Action Plan