नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. भाजपनेही मिशन २०२४ सुरू करुन विविध नेत्यांवर लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. २०२४ मध्ये अर्थातच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. मात्र, विरोधी पक्षांमध्ये अद्याप एकाचेही नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात नाही किंवा सांगितले जात नाही. त्यामुळे विरोधकांकडून नक्की कुणाचा चेहरा पुढे केला जाणार हा प्रश्न आहे.
विरोधकांमध्ये काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल, राजदचे लालू प्रसाद यादव, बीजेडीचे नवीन पटनाईक अशी विविध नावे आहेत. मात्र, यातील एकाही नावाव विरोधकांचे एकमत झालेले नाही. किंबहुना त्यांनी यावर चर्चाच केलेली नाही. आगामी लोकसभेसाठी तरी सर्व विरोधक एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांमध्ये एकी नसल्याचे दिसून आले आहे.
बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नितीश कुमार यांनी दिल्लीचा नुकताच दौरा केला आहे. ते नितीश म्हणाले की, २०१७ मध्ये भाजपसोबत जाऊन मोठी चूक केली होती. नितीश यांनी राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एचडी कुमारस्वामी यांचीही भेट घेतली. नितीश म्हणाले की, माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही. २०२४ मध्ये विरोधकांनी एकत्र यावे आणि भाजपवर दावा ठोकावा, अशी माझी इच्छा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तर, काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की, मोरारजी देसाईंप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या अखेरीस पंतप्रधान व्हायचे नाही.
असा आहे आजवरचा इतिहास
असे म्हणतात की, पृथ्वी जशी गोल आहे तसे राजकारणात देखील एक वर्तुळाकार चक्र फिरत असते. भारतीय राजकारणाच्या इतिहासाचा मागवा घेतला असता असे लक्षात येते की, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर अनेकांना पंतप्रधान होण्याची इच्छा होती. परंतु लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले त्यानंतरही अशीच परिस्थिती निर्माण झाली असता पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान झाल्या. आणीबाणीच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा विरोधक एकत्र आले असता पंतप्रधान पदासाठी शर्यत तथा स्पर्धा सुरू झाली, त्यावेळी मोरारजी देसाई यांनी बाजी मारली आणि चरणसिंग यांना काही काळ थांबावे लागेल. तसेच बाबू जगजीवन राम आणि यशवंतराव चव्हाण यांना देखील उपपंतप्रधान पदावर समाधान मानावे लागले होते.
पुढे कालांतराने पुन्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी उचल खाल्ली आणि पंतप्रधान पदासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. त्यावेळी प्रामुख्याने अनेक नावे समोर आली मात्र इंद्रकुमार गुजराल, एच.डी. देवेगौडा ही पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनी बाजी मारली तर प्रणव मुखर्जी अर्जुन सिंग, शरद पवार यांना पंतप्रधानपदाची खुर्ची लाभली नाही. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाची संधी मिळत असताना त्यांनी ती नाकारली. त्याचप्रमाणे डाव्या पक्षांचे नेते ज्योती बसू यांनी देखील ही संधी नाकारली होती असे दिसून येते
पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर विरोधी पक्ष सत्तेवर आल्यावर देवीलाल, चंद्रशेखर यांचे देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते, त्यापैकी चंद्रशेखर नंतर पंतप्रधान झाले तर देवीलाल यांना उपपंतप्रधान पदावर समाधान मानावे लागले. इतकेच नव्हे तर आडवाणी देखील पंतप्रधान पदाचे शर्यतीत होते, पण त्यांनाही उपपंतप्रधानपदावरच राहावे लागले. थोडक्यात भारतीय राजकारणात असे अनेक दिग्गज नेते होऊन गेले की ते पंतप्रधान पदाच्या अगदी खुर्ची जवळ गेले, परंतु त्यावर विराजमान होऊ शकले नाही.
Loksabha Election 2024 Opposition Parties PM Candidate