नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचची सर्वसाधारण सभा सारडा विद्यालयात नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सन २०२२ ते २०२६ या कार्यकाळासाठी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष रंजनभाई शाह, उपाध्यक्ष भालचंद्र सुर्यवंशी, कार्याध्यक्ष देवराम सैंदाणे, सचिव रमेश डहाळे, खजिनदार जितेंद्र येवले, सहसचिव विठ्ठलराव देवरे, सुरेंद्र गुजराथी यांची तर संचालक मंडळामध्ये विठ्ठलराव सावंत, हरिश्चंद्र निंबाळकर, बाळकृष्ण दंडगांवकर, डी.एम.कुलकर्णी, सुधाकर गायधनी, बापू अमृतकर, प्रकाश महाजन, देवचंद पटेल यांची तर सल्लागार म्हणून श्रीकृष्ण शिरूडे, वसंतराव पुंड यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
यावेळी नुतन अध्यक्ष रंजनभाई शाह म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे नाशिक शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करून ज्येष्ठांना आनंद देण्याचे काम केले. गेल्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व संचालकांनी संस्थेला एका वेगळ्या उंचिवर आणून ठेवले. यापुढील ५ वर्षांच्या काळात आम्ही सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेची घोडदौड अशीच चालू राहील असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
तसेच सचिव रमेश डहाळे यांनी सर्वांना सोबत घेऊन नाशिक शहरातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून एकाकी जीवन जगणार्या ज्येष्ठांना आनंदाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी ब्रिजमोहन चौधरी यांनीही ज्येष्ठांसाठी काम करणार्यांनी पुढे आले पाहिजे व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.