छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑरीक -बिडकीन औद्योगिक प्रकल्पातील औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातुन मराठवाड्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दूरदृश्य प्रणाली द्वारे बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ, छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा येथून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे ,डीएमआयसी सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे महाराष्ट्र औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, महेश पाटील यांच्यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, शासनाने ऑरिक सिटीच्या उद्घाटनापासून ते प्रकल्प पूर्ती करण्याचे काम केले आहे. ८ हजार एकरवर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार असून यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योगाच्या मार्फत करण्यात आली आहे. बिडकीन प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्धतेबरोबरच पायाभूत सुविधांचाही विकास होत आहे.
ऑरिक बिडकीन प्रकल्पाविषयी माहिती
ऑरिक हे भारतातील अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने विकसित केलेले औद्योगिक शहर हे केंद्र (४९%) आणि MIDC (५१%) संयुक्त विद्यमानातून छत्रपती संभाजीनगर येथे १० हजार एकरवर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर च्या माध्यमातून विकसित होत आहे.
ऑरिक औद्योगिक क्षेत्रामध्ये शेंद्रा आणि बिडकीन या दोन औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
बिडकीन औद्योगिक शहर हे ७ हजार ८५५ एकर क्षेत्रामध्ये वसलेले असून रेल्वे व रस्ते मार्गाने जोडले गेलेले आहे.या क्षेत्रापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तसेच जेएनपीटी अवघ्या ३२० किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे भारतातील सर्वात मोठ्या बंदरासाठी सुलभ दळणवळण सुविधा उपलब्ध होत आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधामध्ये
१. प्लग अॅंड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर
२. २४×७ मुबलक विद्युत व पाणी पुरवठा
३. पर्यावरण विषयक परवानगी (EC)
४. योग्य क्षमतेचं CEPT &STP प्रकल्प
५. अद्यावत INTERNET सुविधा
६. Walk to work concept
७. एक खिडकी योजनाव्दारे सर्व परवाने उपलब्ध या सुविधांमूळे हे क्षेत्र बहुराष्ट्र कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये कारखाना उभारण्यासाठी एक आदर्श ठिकाण ठरले आहे.
ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ९ हजार १२२ कोटी पेक्षा जास्त आहे. या क्षेत्रामधून सुमारे ६० हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक निर्माण होणार असून त्याव्दारे सुमारे ३५ हजार प्रत्यक्ष व ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे पुढच्या भविष्याची एक नांदी आहे. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट्स, औषध निर्माण व जैव तंत्रज्ञान, फूड प्रोसेसिंग, अवजड अभियांत्रिक उद्योग आणि कपडे उद्योग यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये
१. भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी अथर एनर्जी
२. औषध निर्माण क्षेत्रातील कंपनी पिरामल फार्मा
३. विशेष पॅकेजिंग कंपनी असलेले कॉस्मो फिल्म आणि
४. ऑटोमोबाईल्स आणि औद्योगिक कंपन्यांसाठी वंगण निर्माण करणारी लुब्रीझॉल या कंपन्याचा समावेश झालेला आहे.
बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्ये टोयाटो किर्लोस्कर मोटर इलेक्ट्रिक व हायब्रीड व्हेईकल विकसित करणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि किर्लोस्कर मोटर्स यांच्यामध्ये ३१ जुलै २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या कंपनीतर्फे प्रकल्पामध्ये वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन असून यामधून ८ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे.
Jsw ग्रीन मोबिलिटी प्रकल्पास मंजूरी दिली असून ही कंपनी सुध्दा २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक् या बिडकीन क्षेत्रामध्ये करणार असून यामधून जवळपास ५ हजार २०० रोजगार निर्मिती होणार आहे.
मराठवाडा क्षेत्रामध्ये शेतीशी निगडित व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे याची जाणीव ठेवून आम्ही बिडकीन ओद्योगिक क्षेत्रामध्ये १०० एकरवर मेगा फुड पार्क विकसित केलेला आहे.
ऑरिक औद्योगिक क्षेत्रामुळे मराठवाड्याचा विकास साधला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वतीने नुकत्यात दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील ६ हजार ५६ एकर क्षेत्रावरती औद्योगिक क्षेत्र निर्माण करत आहोत . यामध्ये सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून जवळपास १ लाख १४ हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.